Vijay Wadettiwar has made serious allegations against the government : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी महापौरपदाच्या आरक्षणाची घोषणा होताच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. विशेषतः नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
नागपूरमधील आरक्षण प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, ही संपूर्ण सोडत पूर्वनियोजित असून त्यामागे राजकीय ‘फिक्सिंग’ झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच विशिष्ट उमेदवाराचे नाव ठरवले होते आणि त्यानुसारच सोयीचे आरक्षण जाहीर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. भाजपच्या शिवानी दाणी यांना महापौर बनवण्यासाठीच आरक्षणाचा हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वडेट्टीवार यांनी नागपूर महापालिकेच्या आरक्षणाचा इतिहास समोर ठेवत काही तांत्रिक मुद्देही उपस्थित केले. गेल्या सुमारे 25 वर्षांत नागपूरमध्ये अनुसूचित जातीसाठी महापौरपदाचे आरक्षण आलेले नाही. यंदा तरी ते अपेक्षित होते, मात्र पुन्हा एकदा खुल्या प्रवर्गात आरक्षण गेले. शिवानी दाणी या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातून निवडून आल्या असून त्या सीएमओमध्ये कार्यरत असल्याकडे लक्ष वेधत, आरक्षणाची प्रक्रिया हेतुपुरस्सर वळवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ज्या महानगरपालिकांमध्ये भाजप संख्याबळात आघाडीवर आहे, तिथेच भाजपच्या सोयीचे आरक्षण काढण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांवरही वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले. खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील वादावर अंतिम निर्णय प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूरमध्ये पुढील पाच वर्ष महापौरपद काँग्रेसकडेच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ पूर्ण झाले असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा नगरसेवक काँग्रेसला पाठिंबा देतील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी वडेट्टीवार यांनी मनसे आणि एमआयएमवरही जोरदार टीका केली. चंद्रपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र येतील, असा दावा मनसेकडून केला जात असला तरी मनसे ही भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच भाजप आणि एमआयएम हे पक्ष जाहीरपणे एकमेकांवर टीका करत असले तरी पडद्यामागे त्यांच्यात समन्वय असल्याचा दावा करत, काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी छुप्या पद्धतीने राजकारण सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
महापौरपदाच्या आरक्षणावरून सुरू झालेला हा वाद आता केवळ राजकीय आरोपांपुरताच मर्यादित राहणार की न्यायालयात पोहोचणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
