अहिल्यानगर एलसीबीतील शामसुंदर गुजर खाकी वर्दीतला ड्रग्ज माफिया; पुणे पोलिसांकडून अटक

नगर जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारा शामसुंदर विश्वनाथ गुजर हा खाकी वर्दीतला ड्रग्ज माफिया असल्याचे उघड.

  • Written By: Published:
Untitled Design (297)

Shamsunder Gujar, drug mafia in khaki uniform, from Ahilyanagar LCB : रक्षकच भक्षक बनला या म्हणीचा प्रत्यय देणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगर जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारा शामसुंदर विश्वनाथ गुजर (बक्कल नं. 2205) हा खाकी वर्दीतला ड्रग्ज माफिया असल्याचे उघड झाले असून, पुणे पोलिसांनी पहाटे चार वाजता त्याला अटक करत संपूर्ण पोलीस यंत्रणेलाच हादरवून सोडले आहे.

पोलीस कस्टडीतील ड्रग्ज थेट बाजारात
नगर पोलिसांनी जप्त केलेल्या तब्बल 25 किलो मेफेड्रोन (एमडी) या मुद्देमालातून 10 किलो एमडी परस्पर चोरून त्याऐवजी मैदा भरल्याची कबुली स्वतः शाम गुजरने दिली आहे. या 10 किलो एमडीची बाजारभावाने किंमत जवळपास 25 कोटी रुपये आहे.
यातील 1 किलो एमडी शिरूरमध्ये विक्री करताना पकडण्यात आला, मात्र उर्वरित 9 किलो एमडी कुठे गेले? कोणाच्या घशात गेले? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

शिरूरमध्ये स्फोटक कारवाई, नगर पोलिसांची अब्रू फाटली
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गॅरेज चालक शादाब रियाज शेख (41) याला 1 किलो 52 ग्रॅम एमडीसह अटक करण्यात आली. चौकशीत हा एमडी थेट नगर एलसीबीतील शाम गुजरने पुरविल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिस खात्यात खळबळ उडाली.

महापौरपदाची सोडत काढणाऱ्या मिसाळांच्या नातेवाईकांचे नाव पुण्यासाठी चर्चेत वाचा संभाव्य यादी…

ज्यांच्या कस्टडीत मुद्देमाल, त्यांच्यावरच संशय!
हा सगळा मुद्देमाल पोलीस अधीक्षक व गुन्हे शाखेच्या निरीक्षकांच्या कस्टडीत, कडेकोट बंदोबस्तात ठेवलेला होता. तरीही गुजर आत शिरला कसा? 10 किलो एमडी बाहेर काढताना कुणाचीच नजर कशी पडली नाही? मैदा मिक्स करून ठेवल्यावरही तपास झाला नाही कसा? शिरूरपर्यंत एवढा मोठा मुद्देमाल पोहोचतोच कसा? हे एकट्या गुजरचे धाडस आहे की वरच्या आशीर्वादाने घडलेला काळा खेळ? हा सवाल आता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दारात जाऊन उभा राहिला आहे.

वादग्रस्त गुजरला एलसीबीची बक्षिसी कशी?
पारनेर पोलिस ठाण्यात असताना मावा-गुटखा तस्करांशी संबंध, अवैध धंद्यांच्या तक्रारी, बदलीसाठी निवेदने तरीही वादग्रस्त गुजरला एलसीबीसारख्या संवेदनशील शाखेत पोस्टिंग देण्यात आली. आणि याच बक्षिसीचा गैरफायदा घेत त्याने थेट 25 कोटींच्या एमडीवर डल्ला मारला.

नऊ किलो एमडी अजूनही बेपत्ता
आजही 9 किलो मेफेड्रोन बाजारात फिरत आहे, तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास मोकळे आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे की संगनमतामुळे?न्याय होणार की प्रकरण दाबले जाणार? संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या तपासाकडे लागले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की
पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथील स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदारास अटक केली. अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईची दखल घेऊन हवालदार श्यामसुंदर गुजर याला निलंबित करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. पुणे पोलिसांत तपासात काय माहिती समोर येते, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

follow us