Download App

Vidhan Parishad Election 2023 : मतदान संपलं! पाचही विभागांत शांततेत मतदान…

मुंबई : विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी आज राज्यात मतदान पार पडलं. सकाळी 8 वाजता सुरु झालेली मतदानाची प्रक्रिया सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होती. यामध्ये अमरावती, कोकण, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, जिल्ह्यांत मतदान पार पडलं आहे. अद्याप या निवडणुकीची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. थोड्याच वेळात आकडेवारीची माहिती समोर येणार आहे.

यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात प्रमुख लढत होत आहे. तर कोकण विभागात महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील विरुद्ध भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात खरी लढत होणार आहे.

तसेच नागपूर मतदारसंघात सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीने तर नागो गाणार यांना भाजपचा पाठिंबा घोषित केला असून या दोघांमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जातंय. तर औरंगाबादमध्ये भाजपचे किरण पाटील आणि राष्ट्रवादीकडून विक्रम काळे यांच्यात लढत सुरु आहे. त्याचप्रमाणे अमरावती विभागात महाविकास आघाडीकडून धिरज लिंगाडे तर भाजप-शिंदे गटाचे उमेदवार डॉ. रणजित पाटील रिंगणात आहेत.

गेल्या महिन्याभरापूर्वीपासून सुरु असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम अखेर थांबला आहे. आज राज्यातील पाचही विभागांत शांतेतत मतदान पार पडलं असून सायंकाळी 5 वाजता मतदानाची प्रक्रिया संपली आहे. या निवडणुकीमध्ये राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात एकसेएक नवे ट्विस्ट पाहायला मिळाले आहेत.

अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये घमासान सुरु असून आज भाजपचे बडे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजित तांबेंनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असं म्हंटलंय. तर दुसरीकडे मी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय, त्यामुळे निवडून आल्यानंतर अपक्षच राहणार असल्याचं सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, येत्या 2 फेब्रुवारीला विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात येणार आहे. पाचही विभागांमध्ये उमेदवार आपलं भवितव्य आजमवत असून विधानपरिषदेचा आमदार म्हणून कोणाची वर्णी लागणार हे आता निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Tags

follow us