मनपा प्रचारात सावरकरांची एंन्ट्री; शेलारांची ठिणगी, मिटकरींचा भडका, मुख्यमंत्र्यांची फुंकर, अजितदादांचा सावध पवित्रा
महानगरपालिका निवडणुकांता आता सावरकरांवरून राजकारण तापलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या जुंपली आहे.
राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका रंगात आल्यात. (Election) प्रचारांचा जोर वाढला तसं राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. जाती धर्मावरून आता इतिहासातील व्यक्तीच्या नावावर विचारांवर राजकारण गेलं आहे. आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी युतीत असल्यामुळे अजित पवार यांनादेखील सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील, असं विधान केलं आहे. त्यावरून आता चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार अमोल मिटकरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
70 हजार कोटींच्या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही; मागची पानं चाळली तर…
काय म्हणाले आशिष शेलार?
आम्ही स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे भक्त आहोत. आम्ही आणि आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालणारे आहोत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षालासुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, असं मंत्री आणि भाजपाचे नेते आशिष शेलार म्हणाले. तसंच, तु्म्ही याल तर तुमच्याबरोबर आणि नाही आलात तर तुमच्याविना…विरोधात शिरला तर विरोधात..आम्ही आमचं काम करत राहू, असा इशारा देखील आशिष शेलार यांनी अजित पवारांना दिला आहे.
अजित पवार काय म्हणाले?
पत्रकार मित्रांनो तुम्ही मला विकासाबद्दल विचारा. आमच्या महायुतीत अंतर कसं वाढेल, यासारखे प्रश्न विचारले जात आहेत. मला फक्त सध्या सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारावेत. मी ज्या महापालिकेत प्रचारासाठी जाईल, त्याच महापालिकेसंदर्भात मला प्रश्न विचाराला हवेत. इतर प्रश्न विचारले तर मी त्याचे उत्तर देणार नाही, इतर प्रश्नांचं उत्तर निवडणुका संपल्यावर देईल, असंही ते म्हणाले.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
मला वाटतं की अजित पवार यांनी सावरकरांच्या विचारांना विरोध केलेला नाही. अजूनतरी मी त्यांना सावरकरांच्या विचारांना विरोध करताना पाहिलेलं नाही. परंतु, आमची भूमिका ही पक्की आहे. सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
प्रिय आशिष शेलार जी ,दादा व दादांचा पक्ष तुमच्या ‘आदर्शांच्या’नेतृत्वावरच चालला पाहिजे हा जो तुमचा अट्टाहास आहे व हे जे तुम्ही ठासून सांगत आहात त्यात किती तथ्य आहे हे तुम्हालाच माहीत.तुर्तास इतकंच सांगेल आम्ही ‘शिव शाहु फुले आंबेडकरी’ चळवळीशी बांधील व प्रामाणिक होतो,आहोत आणि राहु. तुम्हाला अपेक्षित विचारधारा आम्ही जरी स्वीकारत नसलो तरी आमच्या पक्षाची आंबेडकरी विचारधारा तुम्हाला नाईलाजाने का होईना स्वीकारावीच लागते हे त्रिवार सत्य आहे, असं मिटकरी म्हणाले आहेत.
