पवना धरण 55 टक्के भरले पण वीज खंडित झाल्याने पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा विस्कळीत

Pavana Dam : मावळ परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या 24 तासांत पवना

Pavana

Pavana

Pavana Dam : मावळ परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या २४ तासांत पवना धरण क्षेत्रात तब्बल ४२६ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली असून, धरणातील पाणीसाठा आता ५५.०७ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे शहराची पुढील सहा महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र, दुसरीकडे रावेत येथील जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने आज शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ

यंदा मान्सूनचे (Monsoon) आगमन उशिरा झाल्याने पवना धरणातील साठा अवघा १६ टक्क्यांपर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे जलसंपदा विभागाने १९ जूनपासून शहरात १५ टक्के पाणीकपात लागू केली होती. परंतु, जुलैच्या सुरुवातीपासूनच मावळात पावसाने जोर धरला. रविवारी धरणात (Pavana Dam) केवळ २७.६२ टक्के साठा होता, मात्र अवघ्या एक-दोन दिवसांतील मुसळधार पावसामुळे हा साठा थेट ५५ टक्क्यांच्या पार गेला आहे. या हंगामात आतापर्यंत धरण परिसरात एकूण १,२०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

शरद पवार NDA सोबत जाणार? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

रावेत जलउपसा केंद्रात तांत्रिक बिघाड

पावसाचा जोर वाढल्याने रावेत येथील पाणी उपसा केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला. परिणामी, पाणी उपसण्याचे काम तात्पुरते ठप्प झाले असून सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राचे पंपिंग देखील बंद ठेवावे लागले आहे. महावितरण आणि महापालिका प्रशासनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शहराचा पाणीपुरवठा नियमित केला जाईल. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Exit mobile version