Download App

आता एक घंटा देखील वाढवून मिळणार नाही आणि आरक्षण घेऊनच राहणार; जरांगे पाटील आक्रमक

  • Written By: Last Updated:

Maratha reservation : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं यासाठी मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत. जरांगे यांनी सरकारला दिलेला अवधी आता 24 तारखेला संपत आहे. मात्र, अद्याप आरक्षण मिळालं नाही. यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी भाष्य केलं. आरक्षण घेऊनच राहिल. आता सरकारला एक घंटाही वेळ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

वंचितने महाविकास आघाडीत यावे…; पवार-आंबेडकरांच्या भेटीवर कॉंग्रेस नेत्याचं मोठे विधान 

मनोज जरांगे पाटील यांची आज अकलूजमध्ये भव्य सभा झाली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, सरकारने आरक्षण देण्यासाठी ३० दिवसांचा अवधी मागितला. आम्ही त्यांना 40 दिवसांचा वेळ दिला. त्यांना आश्चर्य वाटले. इतके दिवस दिलेच कसे? आपण त्यांना मुद्दाम 40 दिवसांचा वेळ दिला. कारण त्यांना निमित्त हवे होते. त्यांनी आरक्षण दिलं असतं आणि ते टिकलं नसतं तर तुम्ही वेळ दिला नाही, त्यामुळंच आरक्षण टिकलं नाही असं सांगून आरक्षण न देण्याचा सरकारचा डाव होता, असं जरांगे पाटील म्हणाले.

ते म्हणाले, पण आपण त्यांना 30 ऐवजी 40 दिवस दिले आणि त्यांची डाव हाणून पाडला. आता सरकारने वळवळ करू नये. अजून एक दोन दिवस वाढवू मागितले जातील. पण, एक-दोन दिवस तर काय एक घंटाही वाढवून मिळणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मी कामाला लागलोय. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही एक इंचही मागे हटणार नाही. शांतततेच्या आंदोलनानं आरक्षण घेऊच. आता सुटका नाही. त्यांनी अनेक डाव टाकले, पण आपण उधळून लावलेत. एक मातब्बरांची टीम माझ्याकडे आली. बोलणं झाल्यावर मला म्हणाले, कोपऱ्यात चल. मी म्हणालो, मी घरंदाज मराठा आहे. कोपऱ्यात येत नसतो. जे काही बोलायचं ते समोरच बोला, असंही जरांगे म्हणाले.

यावेळी जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना कार्यक्रमही दिला. तुमचं सर्कल, जिल्हा आणि तालुक्यात तयारी सुरू करा. गाफील राहू नका, सरकारची जशी कसोटी तशी आपलीही आहे. कोणतेही गाव सोडू नका. घरोघरी जा. मराठ्यांना आरक्षण का हवंय ते समजून सांगा. हिंसक आंदोलन करू नका. जाळपोळ करू नका. आपल्या पोरांवर केसेस होतात. शिक्षण आणि नोकरीत अडचणी येतील. महाराष्ट्रात एकाही पोरानं आत्महत्या करायची नाही. पोरं मरायला लागली तर आरक्षण घ्यायचं कशाला ? असा सवाल त्यांनी केला.

Tags

follow us