Download App

शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले व इतिहास जपण्याचे काम करु, खासदार लंकेंचे प्रतिपादन

Nilesh Lanke : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपण समाजात वावरतो. शिवरायांचे नाव घेतल्याशिवाय आपला दिवसही जात नाही.

Nilesh Lanke : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपण समाजात वावरतो. शिवरायांचे नाव घेतल्याशिवाय आपला दिवसही जात नाही. त्या राजासाठी महिन्यातील एक तरी दिवस दिला पाहिजे तरच आपल्याला ‘जय शिवाजी जय भवानी’ म्हणण्याचा अधिकार आहे. समाजात दुही निर्माण करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या विचारांची गरज आहे. शिवरायांचे विचार घराघरात, मनामनात पोहोचले पाहिजे. हे विचार पुढे न्यायचे असतील तर शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले व इतिहासाला उजाळा देऊन ते जपण्यासाठी काम करुया असे प्रतिपादन खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केले. ते रविवारी दि.25 रोजी किल्ले रायरेश्वर (ता.भोर) येथील गड किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहिम प्रसंगी शिवभक्तांसमोर बोलत होते.

आपला मावळा संघटनेचा शुभारंभ खासदार लंके यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी खासदार लंके यांनी रायरेश्वर मंदीरात महादेवाचे दर्शन व शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून उपस्थित शिवभक्तांसमवेत स्वराज्याची शपथ घेऊन मोहिमेस सुरवात करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण करून वीज व सौर उर्जाचे दिवे, शिवभक्तांना पिण्याच्या पाण्याचे रांजण, सुचनादर्शक फलक बसविण्यात आले. सभामंडपाच्या खांबांना रंग देण्यात आला. ग्रामस्थांना रेनकोट वाटप केले. पेविंग ब्लॉग, डस्टबीन आदी उपयुक्त वस्तू देऊन विविध उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेची पाहणी खासदार लंके यांच्याकडून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गड किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम करण्याचा निर्णय घेतला असून आतापर्यंत शिवनेरी व धर्मवीर गडावर स्वच्छता व संवर्धन करण्यात आले आहे. 27 एप्रिल 1645 रोजी छत्रपती शिवरायांनी आपल्या जिवलग सवंगड्याच्या साथीने याच रायरेश्वर गडावरील मंदिरात स्वराज्याची शपथ घेऊन ती सत्यात उतरवण्याचे काम केले. त्यामुळे आज पवित्र भूमी असलेला रायरेश्वर किल्ला निवडला असून असल्याचे सांगून या मोहीमेच्या माध्यमातून ‘आपला मावळा’ या संघटनेची स्थापना करून कमिटी नेमण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी प्रत्येक गडावर जाऊन गड किल्ले व संवर्धन संकल्पना रावणार असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.

यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी रामेश्वर निमसे, कार्याध्यक्षपदी सुधीर लाकुडझोडे, उपाध्यक्षपदी दौलत गांगडे व योगिराज गाडे, सचिवपदी सिताराम काकडे, सहसचिवपदी अमोल झेंडे तर खजिनदारपदी अल्ताफ शेख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. खासदार लंके हे शिवभक्तांसह शनिवारी दि.24 रोजी रात्री गडाच्या पायथ्याशी असलेल्या टिटेघर वडतुंबी येथील विद्यालयात मुक्कामी होते. रविवारी सकाळी सर्व साहित्य घेऊन शेकडो शिवभक्तांसह गडावर पोहचले. यावेळी लंके यांनी स्वतः हातात झाडू घेऊन मंदीरात स्वच्छता केली व वृक्षारोपण केले. यावेळी वयोवृद्ध, तरुण, महिला व लहान मुले मुली उपस्थित होते. दरम्यान गडाच्या पायथ्याशी नाष्टा व भोजनाची व्यवस्था संघटनेकडून करण्यात आली होती.

अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा; नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे निर्देश 

पावसात रायरेश्वरावर चढाई

सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असतानाही लोखंडी शिडीवरुन रायरेश्वरावर खा.लंके सहित वयोवृद्ध, महिला,लहान मुलांसह तरुणांनी वृक्षांची रोपे, टिकाव फावडे, मोठाले रांजण, डस्टबीन, लोखंडी फलकांसह अवजड वस्तू नेहल्या. तसेच विज प्रवाह बंद करुन पावसात विजेच्या खांबावर चढून दिवे जोडण्याचे काम करण्यात आले.

follow us