Download App

अहमदनगर महापालिकेच्या १३८७ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी, अमृत पाणी योजनेवर विशेष भर

अहमदनगर : महापालिकेत (Ahmednagar Municipality) आज आर्थिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी महापौर रोहिणी शेंडगे (Rohini Shendge) यांनी विशेष महासभा आयोजित केली होती. या सभेत २०२३-२४ या आर्थिक वर्षांचे १३८७ कोटी ७९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.

महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी महापालिकेच्या स्थायी समितीसमोर १२४० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. या अंदाजपत्रकात स्थायी समितीने वाढ केली. स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी सोमवारी महापौरांकडे १३८७ कोटी ७९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. या अंदाजपत्रकावर आज चर्चा झाली. महापौर शेंडगे यांनी स्थायी समितीने सादर केलेले अंदाजपत्रक मंजूर केले. यात वृक्ष करातून येणारा निधी वृक्ष लागवडीवरच खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नगरमधील रस्ते होणार चकाचक ! खासदार विखेंनी आणले दहा कोटी

अंदाजपत्रकातील ठळक मुद्दे –
· अमृत पाणी पुरवठा योजनेतून वसंत टेकडी येथे पाण्‍याची आवक वाढून लवकरच शहरामध्‍ये मुबलक पाणी पुरवठा करण्‍यात येईल.

· कल्‍याण रस्ता परिसरातील नागरिकांचा पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने प्रशासनास आदेश देण्‍यात आलेले आहेत.

· अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजना फेज-2 योजनेतील पाईप लाईन वितरणाचे काम झालेले असून त्‍या पाईप लाईन द्वारे पाणी पुरवठा वितरणाबाबत कार्यवाही करण्‍यात येईल.

· उपनगरासाठी आवश्‍यक असणारी अमृत योजने अंतर्गत शहरी भुयारी गटर योजना टप्‍पा 2 शासनाकडे मंजूरीसाठी प्रस्‍ताव सादर केले आहे. या आर्थिक वर्षात या योजनेस मंजुरी मिळाल्‍यास उपनगरातील ड्रेनेज लाईनचा प्रश्‍न मार्गी लागण्‍यास मदत होणार आहे.

· शहरातील भावी पिढीस महापुरूषांचा आदर्श निर्माण व्‍हावा याकरिता अहमदनगर महापालिका परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविणेचे काम सुरू आहे. तसेच सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा तसेच मार्केट यार्ड चौक येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसविणे, माळीवाडा वेस येथे महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्‍ध करून देण्‍यात आला आहे. लवकरच महापुरूषांचे पुतळे बसविण्‍यात येतील.

· महिलांसाठी विविध योजना, सांस्‍कृतिक कार्यक्रम, प्रशिक्षण, शिबिरे आयोजित करुन महिलांना सक्षम करण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रोत्‍साहित करणार आहे.

· शहर स्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण व माझी वसुंधरा योजने अंतर्गत शहरामध्‍ये मोठयाप्रमाणात वृक्ष लागवड, उदयान विकसीत करणे तसेच पर्यावरणाच्‍या दृष्टीने विविध विकास कामे करण्‍यात येणार आहे. यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलण्‍यास मदत होणार आहे.

· अहमदनगर महापालिकेला पुढील कालावधीत फाईव्‍ह स्‍टार मानांकन मिळावयाचे आहे याकरिता सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य अपेक्षित आहे.

· कै.बाळासाहेब देशपांडे दवाखान्‍याची अद्यावत सुविधेसह नवीन इमारत बांधण्‍यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्‍यात येईल.

· शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी महापालिकेस प्राप्‍त झालेला आहे. यानिधीतून शहर व उपनगरातील विकास कामे प्रस्‍तावित करण्‍यात आलेली असून येत्‍या एक ते दोन महिन्‍यांमध्‍ये सदरची कामे पूर्ण होवून शहर सौंदर्यात भर पडणार आहे.

· नाट्यगृहाचे काम प्रगतीपथावर आहे. या आर्थिक वर्षात नाट्यगृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन नाट्य रसिकांसाठी नाट्यगृह खुला करण्‍याचा प्रयत्‍न करणार आहे.

· शहर व उपनगरातील प्रमुख रस्‍त्‍यांची कामे हाती घेण्‍यात आलेली आहेत. याच पध्‍दतीने आणखी प्रमुख रस्‍ते या आर्थिक वर्षात प्रस्‍तावित करण्‍याचा प्रयत्‍न करणार आहे.

· शहर सौंदर्यात भर पडण्‍यासाठी अहमदनगर महापालिका हद्दीतील छोटे मोठे चौक सुशोभिकरण, रस्‍त्‍याच्‍या मधोमध डिव्‍हायडर टाकून सुशोभित करण्‍यात येईल.

Girish Bapat : पुण्याची ताकद गिरीश बापट…! घोषणेने गिरीश बापट यांना अखेरचा निरोप

· चितळे रोड येथील नेहरू मार्केटच्‍या जागी शॉपिंग कॉम्‍प्‍लेक्‍स व सावेडी शॉपिंग कॉम्‍प्‍लेक्‍स महापालिकेच्‍या माध्‍यमातून बांधण्‍यात येणार आहे. यादृष्टीने प्रशासनास कार्यवाही करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आलेल्‍या आहेत.

· महापालिकेच्‍या पिंपळगांव माळवी येथील जागेतून उत्‍पन्‍न वाढविण्‍याच्‍या दृष्टीने मोठा प्रकल्‍प आणण्‍यासाठी कार्यवाही सुरू आहे.

· पिंपळगाव माळवी येथील तलावामध्‍ये बोटिंग सुरु करुन महापालिकेच्‍या उत्‍पन्‍नात वाढ करण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येईल.

· महापालिकेच्‍या जागेत व्‍यावसायिक इमारत बांधणे, गाळे बांधून भाडे तत्‍वावर देवून महापालिकेच्‍या उत्‍पन्‍नात वाढ करण्‍याच्‍या दृष्टीने प्रयत्‍न करणार आहे.

Tags

follow us