अहमदनगर : अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या नामांतराचा विषय चर्चिला जात आहे. धनगर समाजाच्यावतीने ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ नामांतर यात्राही काढण्यात आली आहे. माझा कोणत्याही नावाला विरोध नव्हता व नाही. मात्र सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा, त्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
अहमदनगर मधील धनगर समाज सेवा संघच्यावतीने राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मार्गदर्शन करतांना खासदार डॉ.सुजय विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार अॅड. रामहरी रुपनर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक निखिल वारे, वधू वर सूचक मेळाव्याचे अध्यक्ष राजेंद्र तागड, प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ, इंजि. रंगनाथ भोंडवे, दत्तात्रय गावडे, निशांत दातीर, सचिन डफळ, काका शेळके आदी उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या कामाचा आवाका प्रचंड मोठा आहे. अहमदनगर जिल्हाला त्यांचे नाव देण्याचा प्रास्ताव आहे, नामांतर होण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही समाजाच्यादृष्टीने गौरवास्पद बाब आहे, त्यामुळे जगाच्या पटलावर नगरचे नाव अहिल्याबाई होळकर म्हणून कोरले जाणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.