अहमदनगर : संभाजीनगर आणि धाराशिव नामकरण याचा विषय हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये असतानाच त्यावेळेला घेतला होता. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहराचे नामांतरण आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या काळातच केलं होतं. पण नामांतरणाच्या पुढील गोष्टी ह्या केंद्र सरकारच्या हातामध्ये असतात. मात्र नामांतरण जेवढं महत्त्वाचं आहे, तितकंच महागाई कमी करणे, तरुण-तरुणींना रोजगार देणे महत्त्वाचे आहे. त्याकडेही सरकारने लक्ष दिलं पाहिजे,’ असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे आले होते. त्यानंतर त्यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी राज्यात दोन जिल्ह्याचे झालेल्या नामांतरावर अजित पवार म्हणाले, ‘नामांतराच्या मुद्द्यावरून दोन समाजामध्ये तेढ पसरू नये, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
समस्त माता-भगिनींचा आपल्याला अभिमान; अजित पवारांनी दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा
तसेच यापूर्वीही देशांमध्ये अनेक शहरांचे नामांतरण झाले आहे. उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनीही बहुतांश शहराला महापुरुषांची नावे दिली आहेत. लोकशाहीमध्ये काम करताना बहुमताचा आदर करून पुढे जायचं असतं. त्यालाच खरी लोकशाही म्हणतात. पण यामधून धर्मा- धर्मामध्ये तेढ निर्माण होणार नाही,’ हेही पाहणे गरजेचे आहे.
शेतकरी राज्यकर्त्यांची खुर्ची उचकटून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही
रस्ते प्रश्नावर पवार म्हणाले…
अजित पवार यांनी नगर येथील आमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला येऊन नगरच्या रस्त्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली होती. याबाबत त्यांना विचारले असता अजित पवार म्हणाले, मी त्या रस्त्यावर जात असताना 50 टक्के कामे आता सुरू असल्याचे दिसून आलेले आहे. पूर्वी दोन तास नगरला यायला लागायचे, आता एक ते सव्वा तासांमध्ये येत आहोत. कालांतराने हा रस्ता पूर्ण होईल. मात्र अद्याप पर्यंत रस्ता पूर्ण झाला नाही, हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. काही कामे सुरू आहेत. काही ठिकाणची कामे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.