सोलापूर : जिल्ह्यातील (Solapur) मंद्रूप येथील विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा (bailgadi morch) मुंबईच्या दिशेने निघाला आहे. नियोजित असलेल्या मंद्रूप एमआयडीसीच्या (Mandrup MIDC) क्षेत्रात असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावरुन एमआयडीसीचे नाव काढावे आणि आमचे नाव लावावे अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.
शेतकरी मोर्चाचे (Farmers Morcha) प्रमुख प्रविण कुंभार यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षापासून सातबाऱ्यावरील एमआयडीसीचा शेरा काढण्यासाठी पाठपुरावा करीत होतो. गेल्या सहा महिन्यांपासून तलाठी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करीत आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मागील आंदोलनात लवकरात लवकर सातबाऱ्यावरील शेरा काढण्यात येईल असे सांगितले होते. पण अश्वासनाशिवाय काहीच भेटले नाही. त्यानंतर 8 मार्च पर्यंत लेखी आश्वासन भेटले नाही तर मुंबईला निघणार म्हणून कळवले होते. त्यानंतर मंद्रूप ते मुंबई असा मोर्चा काढला आहे, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
आमची बागायती शेती सोडून तुम्हाला कुठे एमआयडीसी करायची ते करा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सातबाऱ्यावर असणारा एमआयडीसीचा शेरा जोपर्यंत काढणार नाही, तोपर्यंत आम्ही मुंबईतच राहू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आमच्या जमिनीवर एमआयडीसीचा शेरा दिल्यामुळे कोणतेही कर्ज मिळत नाही. त्यामुळे शेती कशी करायची. या सर्वामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.