अहमदनगर : बळीराजासाठी अत्यंत महत्वाचा असलेला पोळा (Pola) हा सण अवघ्या एका दिवसावर आला आहे. हा सण शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असल्यानं बाजारपेठा देखील लखलखीत सजल्या आहेत. मात्र यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच लम्पी रोगाच्या आजाराने थैमान घातल्याने बळीराजा चिंतेत आहे. एकंदरीतच यंदाच्या बैलपोळ्यावर दुष्काळाचे, महागाईचे व लम्पीचे (Lumpy) सावट असल्याचे चित्र सध्या बाजारात दिसून येत आहे.
वर्षानुवर्षे चालत आलेला बैलपोळा साजरा करण्याची परंपरा आजही कायम आहे, ग्रामीण भागात प्रत्येक गावात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करून बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांसाठी त्यांचे बैल वर्षभर शेतात काम करतात. त्यामुळे बैलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पोळ्याच्या दिवशी बैलांची रंगरंगोटी करून त्यांची पूजा केली जाते. यंदा बैलपोळा १४ सप्टेंबरला तर तान्हा पोळा १५ सप्टेंबरला आहे. यासाठी बाजारपेठेतील दुकाने बैल सजावटीच्या साहित्यांनी सजली आहेत. बैलांच्या साजाची दुकाने तसेच मातीचे बैल विक्री कऱणारे दुकाने निरनिराळे व विविध रंगी बैल जोड्या घेऊन बाजारपेठेत दाखल झाली आहेत.
‘शासन आपल्या दारी अन् खर्च सर्वसामान्यांच्या माथ्यावरी’; जयंत पाटलांनी सरकारला घेरलं
शहरात पोळा सणा निमित्ताने बाजारपेठा सजलेली आहे, मात्र, परंतु दुष्काळ आणि महागाईचे सावट असल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठांकडे पाठ फिरवलेली दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके करपून गेले आहे. तब्बल दीड-दोन महिने पावसाने उघडीप दिल्यान खरिपातील पिकांना मोठा फटका बसला आहे. जमिनीतील पाणी पातळी कमी प्रमाणात आहे. अशीच जर परिस्थिती राहिली तर यंदाच्या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.
बैलांच्या साज खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे. बाजारपेठांमध्ये सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पाणीटंचाई असल्यामुळे बैलांना धुण्यासाठीही पाणी नाही. दुष्काळाचे सावट असताना पोळा सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित होत आहे.