मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणात इडीकडून (ED) आज मुश्रीफ यांच्या मालमत्ता असलेल्या दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि पुणे येथे ही कारवाई सुरू आहे. त्यांचे कार्यालय, घरांची झडती इडी घेत आहे. यापूर्वीही इडीने या ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यानंतर ही दुसऱ्यांदा छापेमारी सुरू आहे.
मुश्रीफ यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी इडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या मुलांविरोधात चाळीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. हा दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी सुरू आहे.
ED Raid : लालूंच्या अडचणी वाढणार? दिल्लीपासून मुंबईपर्यंत ED ची छापेमारी
त्यात आता इडीने मुश्रीफ यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. इडीने पुणे, कोल्हापूर येथील त्यांच्या मालमत्तेवर छापेमारी सुरू केली आहे. या कारवाईतून इडीच्या हाती काय लागले आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.
परंतु सातत्याने मुश्रीफ यांच्यावर इडीकडून होत असलेल्या कारवाईवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. मुश्रीफ यांना ईडीमार्फत भाजपकडून त्रास दिला जात असल्याच्या आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.
इडीपाठोपाठ आता सहकार विभागाने कारवाई सुरू केली आहे. कारखान्याला कर्जपुरवठा करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी दोन दिवसांपूर्वी विभागीय सहनिबंधक डी. टी. छत्रीकर यांची लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे सहकार विभागाकडून चौकशी आणि इडीची कारवाईमुळे मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत.