अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एका इन्फ्लुएंझा बाधित युवकाचा मृत्यू झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना सुरु करण्यात आल्या असून कोरोना काळात आपण ज्या नियमांचं पालन केलं आहे, त्याच नियमांचं नागरिकांना पालन करण्याच आवाहन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केलं आहे.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, इन्फ्लुएंझाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर जिल्हा शल्य चिकीत्सक आणि आरोग्य अधिकाऱ्यांकडून या मृत्यूची चौकशी सुरु आहे. कोरोना काळात सोशल डिस्टसिंग पाळणं, सॅनिटायझरचा वापर, गर्दीत जाणं टाळणं, अशा सूचना जिल्हाधिकाही सिद्धराम सालीमठ यांनी नागरिकांना केल्या आहेत.
नागरिकांनी घाबरुन न जाता आत्तापर्यंत शासनाने ज्या सूचना दिल्या आहेत, त्यांचं पालन करणं आवश्यक असून यापुढे शासनाकडून मार्गदर्शक सूचना आल्यास सांगणार असल्याचं जिल्हाधिकारी सालीमठ यांनी स्पष्ट केलं आहे. इन्फ्लुएंझाबाधित युवकाचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यात कोरोना काळात जे आरोग्य पथक काम करीत होतं, तेच पथक काम करीत असून काही बदल करायचे असतील तर आम्ही ते करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
मालोजीराजे भोसले पर्यटन विकास आराखड्यासाठी पर्यटनमंत्र्यांची मोठी घोषणा
इन्फ्लुएंझा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकाऱ्यांचं पथक सतर्क असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, इन्फ्लुएंझामुळे (H3N2) राज्यातील पहिला मृत्यू अहमदनगर शहरात झाला आहे. या तरुणाचा सोमवारी रात्री साडेदहा वाजता मृत्यू झाला.
या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे देण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून इन्फ्ल्युएंझामुळे या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. इन्फ्लुएंझामुळे राज्यात पहिला बळी अहमदनगरमध्ये गेल्याने नगरकरांसह राज्यातील जनतेची चिंता वाढली असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.