सांगली : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात काँग्रेसने सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडला आहे. याबाबत मुंबईत पार पडलेल्या बैठकीत आज (4 फेब्रुवारी) निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, या बदलामुळे आता पहिल्यांदाच शिवसेना सांगली तर 1999 नंतर काँग्रेस कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा लढवणार आहे. आता कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती उमेदवार असण्याची शक्यात आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला सक्षम उमेदवार शोधावा लागणार आहे. (In exchange for Kolhapur Lok Sabha constituency, Congress has give Sangli Lok Sabha constituency to Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray)
विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी एकनाथ शिंदेसोबत जाणे पसंत केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांची संख्या, काँग्रेसची महापालिका, जिल्हा परिषद यावरील सत्ता आणि सतेज पाटील यांच्यासारखे नेतृत्व या बळावर काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. तसेच शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे काँग्रेस कोल्हापूरसाठी आग्रही असल्याचे दिसून आले होते. या वादात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनीही हस्तक्षेप करत कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी ठाकरे यांना तयार केले. अखेरीस कोल्हापूरच्या बदल्यात दुसरा मतदारसंघ द्यावा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली होती.
अखेरीस दोन्ही पक्षांमध्ये समेट होऊन कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडण्यावर आजच्या बैठकीत एकमत झाले आहे. मात्र यामुळे कोल्हापूरमधील निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. कारण 2019 मध्ये जिल्ह्यातील हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे खासदार होते. तर आता हातकणंगले राजू शेट्टी यांना सोडण्याचे निश्चित झाले आहे. तर कोल्हापूर काँग्रेसला सोडण्यात आला आहे. दरम्यान, आता काँग्रेसकडून लोकसभेसाठी तयारी करत असलेले विशाल पाटील काय करणार असा सवाल विचारला जात आहे. गतवेळीही विशाल पाटील यांनी काँग्रेसकडून लोकसभेसाठी तयारी केली होती. मात्र अखेरच्या क्षणी हा मतदारसंघ जागा वाटपात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुटला. त्यामुळे नाईलाजाने पाटील यांनी स्वाभिमानीचे तिकीट घेतले होते. आता यावेळी विशाल पाटील मशाल चिन्हावर लढणार की अपक्ष उडी घेणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र केसरीचा दुहेरी किताब पटकावणारे चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. बैलगाडी शर्यती, रक्तदान शिबिरे यामाध्यमातून ते जनसंपर्क वाढवत आहेत. गावोगावच्या कुस्ती मैदानांना भेटी देत पैलवानांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करत आहेत. सांगलीची जागा ठाकरे गटाला जाणार असल्याची कुणकुण लागताच पैलवान पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश करुन ठाकरे गट त्यांना उमेदवारी देणार का की विशाल पाटील हेच मशालीच्या चिन्हावर लढणार हे बघावे लागणार आहे.