Kolhapur Loksabha : कोल्हापुरकरांनी (Kolhapur Loksabha) छत्रपतींच्या गादीलाच मत देऊन पसंती दिली असल्याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहु महाराजांनी (Chatrapati Shahu Maharaj) महायुतीचे उमदेवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना चारीमुंड्या चीत करुन दिल्ली गाठलीयं. मतमोजणीच्या अखेरच्या फेरदरम्यान, शाहु महाराजांना 4 लाख 82 हजार 398 मते मिळाली असून महायुतीचे उमदेवार संजय मंडलिक यांना 3 लाख 87 हजार 566 मते मिळाली आहेत. शाहु महाराजांनी 94 हजार 832 मतांचा लिड घेत संजय मंडलिक यांचा पराभव केला आहे.
छत्रपती शाहु महाराजांच्या विजयाची अद्याप निवडणूक आयोगाकडून अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नसून काही वेळानंतर घोषणा करण्यात येणार असल्याचं सांगण्यता येत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार छत्रपती शाहु महाराजांनी 94 हजार 832 मतांचा लिड घेतलायं. त्यामुळे आता फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याचंच बाकी आहे. आयोगाकडून घोषणा होण्याआधीच कोल्हापुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष साजरा करण्यात येत आहे. यावेळी जोरदार फटाके फोडून, ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांकडून नाद खुळा जल्लोष सुरु आहे. विशेष म्हणजे निवडणूक काळात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महाराजांसाठी आख्खा मतदारसंघच पिंजून काढला होता. त्यामुळे शाहु महाराजांच्या विजयामुळे सतेज पाटील समर्थकही चांगलेच खुश झाले आहेत.