Download App

..तर ईडी, जिल्हा बँकेच्या चौकशीची यादीच बाहेर काढू; मुश्रीफांविरोधात शरद पवार गट आक्रमक

NCP News : अजित पवार गट (AJit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून राष्ट्रवादीतील (NCP) दोन्ही गटात शाब्दिक टीका वाढली आहे. आता तर एकमेकांना इशारेही दिले जाऊ लागले आहेत. अशाच एका इशाऱ्याने अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची धाकधूक वाढण्याची शक्यता आहे. शरद पवारांचा पक्ष म्हणजे निष्ठावंतांची राष्ट्रवादी आहे. या गटाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा ईडी चौकशीत किंवा जिल्हा बँक चौकशीत नेमके काय झाले? याची यादीच बाहेर काढू, असा इशारा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी मुश्रीफ यांचे नाव न घेता दिला. परंतु, त्यांचा रोख मुश्रीफ यांच्याकडेच होता.

Ahmednagar Politics : 2024 मध्ये कुणाचं सरकार? तनपुरेंनी स्पष्टच सांगितलं

मंत्री मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) जनमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पाटील यांनी थेट इशारा देत आगामी काळातील राजकीय संघर्षाचे रणशिंग फुंकले. 2024 च्या निवडणुकीत कागलमधून राष्ट्रवादी गटाचा उमेदवार आम्ही देणार आहोत. गटांतर्गत चहाडी करून आपण आपली राजकीय पोळी 35 वर्षे भाजून घेतली. चुकीची कामे केली म्हणूनच तुम्हाला भाजपबरोबर (BJP) जावे लागले. सामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले स्वतःचाच स्वार्थ साधून घेतला. पण, आता येथून पुढे जिल्ह्यात किंवा तालुक्यात कुठेही आडवे आलात तर याद राखा, असा रोखठोक इशारा पाटील यांनी दिला.

तुम्हाला शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी ताकद दिली. पण, त्याचा वापर अवैध संपत्ती गोळा करण्यासाठी केलात. आता हे सगळं बाहेर येऊ नये यासाठीच भाजपबरोबर गेलात, असा आरोप माजी आमदार राजीव आवळे यांनी केला. या मेळाव्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वाद आधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मंत्री मुश्रीफ यांनी याआधीही ज्यावेळी तपास यंत्रणांकडून चौकशी झाली त्यावेळी पक्षनेतृत्वाकडून पाहिजे तसा पाठिंबा मिळाला नाही असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती. आम्हाला जो काही दिलासा मिळाला तो न्यायालयाकडूनच मिळाला असेही मुश्रीफ म्हणाले होते. या वक्तव्यावरून त्यांचा रोख राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेच होता. त्यानंतर आता पुन्हा शरद पवार गटाने आक्रमक होत इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही गटातील राजकीय संघर्ष आधिक तीव्र होण्याची शक्यता दिसत आहे.

Tags

follow us