Sharad Pawar Press Conference : राज्यात निवडणुका जवळ आलेल्या असताना राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या घडामोडींत राज्याच्या मुख्यमंत्रिदाचा चेहरा कोण असेल हा प्रश्न जरा जास्तच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा त्याला माझा पाठिंबा असेल असे वक्तव्य केले होते. मात्र काँग्रेस आणि शरद पवार गट (Sharad Pawar) या मुद्द्यावर उदासीन आहेत. शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा या मुद्द्यावर भाष्य करत ठाकरेंची मागणी पुन्हा अमान्य केली. यावेळी तर त्यांनी थेट मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युलाच सांगून टाकला. आताच मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करावं असा आमचा आग्रह नाही, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी आज सकाळी कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर राज्य सरकारला घेरले. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, आताच मुख्यमंत्रिपदाचं नाव जाहीर करावं असा आमचा आग्रह नाही. या मुद्द्यावर आताच बोलणंही योग्य होणार नाही. मुख्यमंत्रिपदासाठी आताच चेहरा देण्याची गरज वाटत नाही. लोकांच्या पाठिंब्यानंतर एक स्थिर सरकार देणं महत्वाचं आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबद्दल संख्याबळावर निर्णय घेतला जाईल. ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल असे शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं.
सध्या आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जात आहोत. निवडणुकीनंतर भूमिका मांडून मुख्यमंत्री आमच्याच विचारांचा असला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मग तो मुख्यमंत्री कुणाचाही करा. प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. संघ जर भाजपाचाच मुख्यमंत्री व्हावा असं म्हणत असेल तर तो त्यांचा विचार आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी सातत्याने होतेय. काँग्रेस नेते मात्र या मागणीला अनुकूल नाहीत. मग राष्ट्रवादी काँग्रेसची याबाबत काय भूमिका आहे असे विचारले जात होते. त्यावर शरद पवार काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, आमच्यात कुणालाच इंटरेस्ट नाही. कुणाला प्रोजेक्ट करायचं नाही. आम्हाला फक्त सत्ता परिवर्तनाचं ध्येय. राज्यातील सत्तेत बदल घडवून लोकांना पर्याय कसा देता येईल यावर लक्ष केंद्रीत करू या. या मुद्द्याची (मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार) आता काहीच गरज नाही. मी ही मुख्यमंत्री होण्याचा तर प्रश्नच नाही.
समरजित घाटगे फक्त आमदारच राहणार नाहीत तर..,; शरद पवारांनी शब्दच दिला