kolhapur politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif). दोन वर्षांपूर्वी हेच मुश्रीफ प्रचंड अचडणीत आलेले. साखर कारखान्यात, जिल्हा बँकेत शंभर कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा मुश्रीफांवर आरोप झाला. त्यांच्या घरावर, कार्यालयावर, ईडीने, आयकर विभागाने छापेमारी केली. मुश्रीफांमागे भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) हे हात धुवून लागलेले. आता मुश्रीफही जेलमध्ये जातायत का ? अशी परिस्थिती होती. त्यानंतर महायुतीमध्ये आलेले हसन मुश्रीफ हे थेट कोल्हापूरचे एकप्रकारे बॉसच झालेत. शिवाय त्यांचा मुलगा नविदला मोठे पद मिळाले. कोल्हापूरच्या गटात तटाच्या राजकारणात हे कसे झाले ? त्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कसा रोल आहे. गोकुळमध्ये (GOKUL) भविष्यात काँग्रेसचे सतेज पाटील यांना धोबीपछाड मिळेल का ? ते पाहुया…
कोल्हापूरचे राजकारण फिरते ते साखर कारखाने, जिल्हा बँक आणि कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजे गोकूळ भोवती. गोकुळचे राजकारण आपण दोन दिवसांपूर्वीच पाहिलंय. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या गटाचे वर्चस्व दूध संघावर आहे. अरुण डोंगळे हे गोकुळचे अध्यक्ष होते. परंतु त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. त्यामुळे गोकुळचे राजकारण ढवळून निघाले होते. मुश्रीफांकडून दबाव आल्यानंतर अरुण डोंगळे यांनी पद सोडले. अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, यासाठी अनेक नावे चर्चेत होते. त्यातील गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकरांचा मुलगा शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव फायनल झाले होते. सर्व संचालक, सतेज पाटील, हसन मुश्रीफही यांचेही एक या नावावर एकमत झाले होते.
फडणवीसांचा फोन अन् नविद यांना अध्यक्षपद
सत्ताकेंद्र, अर्थकेंद्र हे आपल्याच ताब्यात असावे, यासाठी महायुतीचा अध्यक्ष व्हावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप केला. त्यासाठी त्यांनी थेट मुश्रीफ यांना फोन केल्याचे बोलले जाते. त्यानंतर शुक्रवारी निवड असताना गुरुवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या कॅबिनमध्ये एक बैठक झाली. या बैठकीत गोकुळच्या अध्यक्षपदाचे नाव लिफाफ्यात बंद करून. ज्येष्ठ संचालक व गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे हे नाव सुपूर्द केले. त्यानंतर नविद यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली होती. विशेष म्हणजे नविद यांना अध्यक्षपद देऊ नये, असा विरोध हसन मुश्रीफांचा होता. एकाच घरात दोन मोठे पद नको, असे त्यांचे मत होते. परंतु शेवटी एक वर्षासाठी नविद मुश्रीफ अध्यक्ष झाले. पण विशेष म्हणजे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही नविदच्या नावाला विरोध दर्शविला नाही, म्हणजेच पुढे भविष्यात सतेज पाटील आणि मुश्रीफ हे एकसंध राहू शकतात.
गोकूळ दूध संघ सत्तेची चावीच
गोकूळ सहकारी दूध संघ हा राज्यातील सर्वात मोठा दूध संघ आहे. राज्यांमधील अनेक जिल्ह्यात दूध संघ बंद पडलेत. पण दूध संघाची वार्षिक उलाढाल साडेतीन हजार कोटींची आहे. गेल्या वर्षी 3 हजार 427 कोटी रुपयांची उलाढाल झालेली आहेत. दर दिवसाला 15 लाख लिटरचे दूध संकलन होते. तर वर्षभरात 48 कोटी लीटर दूध संकलन होते. म्हणजे दूध उत्पादक व गोकुळचे नाते कसे आहे, यावरून दिसून येते. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पुढील वर्षीय संपतोय, तेव्हा पंचवार्षिक निवडणूक होईल.
कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद हसन मुश्रीफांकडे आहे. तर आता गोकुळचे अध्यक्षपद त्यांच्या घरातच आलेले आहेत. हसन मुश्रीफ हे मंत्रीही आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची कमांड वाढल्याचे दिसून येत आहे. मुश्रीफ हे आता केवळ कागल मतदारसंघाचे नेते राहिलेले नाहीत. ते आता कोल्हापूरचे बॉस झालेत, असेच म्हणावे लागेल. तीन वर्षांपूर्वी भाजपचे नेते ज्या मुश्रीफांना संपविण्यासाठी निघाले होते, तेच मुश्रीफ आता भाजपच्यात मदतीने कोल्हापूरचे किंग ठरत आहेत.