Download App

अजितदादांनी भाजपचे दोन माजी खासदारच फोडले; महायुतीतच फिरले घड्याळाचे काटे

माजी खासदार संजय काका पाटील आणि प्रताप पाटील चिखलीकर या भाजपाच्या माजी दोन खासदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Ajit Pawar NCP : विधानसभा निवडणुकीत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात (Maharashtra Elections 2024) मोठ्या राजकीय उलथापालथी होताना दिसत आहेत. या राजकीय घडामोडींचं केंद्र नांदेड (Nanded) आणि सांगली ठरू लागलं (Sangli News) आहे. जागावाटपात युती अन् आघाडीत अनेक मतदारसंघांची अदलाबदल झाली आहे. त्यामुळे इच्छुकांना पक्षांतर करणे भाग पडत आहे. यामध्ये राजकारणातील चर्चित चेहरेही आहेत. नुकत्याच पक्षांतराच्या दोन मोठ्या घटना शुक्रवारी सकाळी घडल्या.

माजी खासदार संजय काका पाटील (Sanjay Patil) आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर या (Pratap Patil Chikhalikar) भाजपाच्या माजी दोन खासदारांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या दोन्ही माजींनी घड्याळ हातात घेताच त्यांचा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीचा मार्गही मोकळा झाला आहे. महायुतीतील पक्षातच हा प्रवेश झाल्याने निवडणुकीत याचा फटका बसणार नाही असा दावा केला जात असला तरी यानिमित्ताने अजित पवार यांनी भाजपाचे दोन खासदार फोडलेच आहेत.

मोठी बातमी! भाजपाच्या संजय काकांच्या हाती घड्याळ, रोहित पाटलांविरुद्ध लढत ठरली

तासगावात पाटील विरुद्ध पाटील फाईट

सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ या मतदारसंघातून शरद पवार गटाने दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात कुणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न अजित पवार गटासमोर होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. भाजपाचे माजी खासदार संजय पाटील यांनी आज सकाळी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर तासगाव मतदारसंघात संजय पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी लढत ठरली आहे.

संजय पाटील लोकसभेच्या रिंगणात होते. त्यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघाची चर्चा देशभरात झाली होती. या मतदारसंघावरून आघाडीत वादही झाले होते. ठाकरे गटाने येथून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. भाजपने संजय पाटील यांना तिकीट दिलं होतं. मात्र या निवडणुकीत विशाल पाटील यांनी बाजी मारली.

आता लोकसभेतील पराभवातून सावरत संजय काका पाटील यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. जागावाटपात तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला आहे. तेव्हा संजय पाटील यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर अजित पवार गटालाही रोहित पाटील यांच्या विरुद्ध तगडा उमेदवार मिळाला आहे. आता येथे पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि पाटील विरुद्ध पाटील अशी लढत होणार आहे. या लढतीत मतदार कुणाच्या पारड्यात मतांचं दान टाकतात याचं उत्तर निकालानंतर मिळणार आहे.

“शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद”; अजितदादांच्या आमदारांचं मोठं विधान

प्रताप चिखलीकरांचा भाजपला रामराम

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. नांदेड जिल्ह्यात प्रताप पाटील चिखलीकर मातब्बर नेते म्हणून परिचित आहेत. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. तेव्हा भाजपने त्यांना तिकीट देत थेट तत्कालीन काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या विरुद्ध मैदानात उतरवले होते. चिखलीकर यांनी भाजपाचा विश्वास सार्थ ठरवत अशोक चव्हाणांचा तब्बल एक लाखांहू अधिक मतांनी पराभव केला होता.

जिल्ह्यातील लोहा कंधार या मतदारसंघाचे त्यांनी दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. चिखलीकर आधी काँग्रेसमध्ये होते. नंतरच्या काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा पक्षबदल त्यांनी केला आहे. आताच्या विधानसभा निवडणुकीत जी राजकीय समीकरणं नव्याने तयार झाली आहेत. ती पाहता त्यांनी भाजप सोडणे भाग पडले आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास चिखलीकर इच्छुक आहेत. मात्र जागावाटपात हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी भाजप सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.

 

follow us