कोल्हापूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या मुरलीधर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या भेटीवर आक्षेप घेऊन टीका केली होती. शेट्टींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मला नको पण सामन्य शिवसैनिकाला उमेदवारी द्या, हातकणंगलेत आता उपरा उमेदवार नको. सामान्य शिवसैनिकांवर हा अन्याय आहे, अशी विनंती त्यांनी ठाकरे यांना केली होती. यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. (Muralidhar Jadhav, district president of the Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray), has been expelled from the post of)
राजू शेट्टी यांनी नुकतेच उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री बंगल्यावर भेट घेतली. ही भेट उद्योगपती गौतम अदाणी यांच्या त्रासाविरोधात असल्याचे त्यांनी म्हंटले होते. पण मूळ उद्देश हा राजकीय संदेश देणे हाच असल्याचे बोलले गेले. त्याचवेळी कोल्हापूरचे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनीही म्हंटले की राजू शेट्टींना महाविकास आघाडीसोबत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. याबाबत त्यांच्याशी दोनवेळा प्राथमिक चर्चाही झाली आहे, त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न करत आहोत, असा दावा केला होता.
हातकणंगलेमधून लोकसभेसाठी जिल्हाप्रमुख असलेले मुरलीधर जाधव ठाकरे गटाकडून तयारी करत होते. पण ठाकरे-शेट्टींची भेट होताच त्यांच्या तयारीला ब्रेक लागला. त्यांनी या भेटीवर तीव्र आक्षेप घेतला. राजू शेट्टींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आम्ही साहेब पहिल्यापासून तुमच्यासोबत आहे. 195 बीपी झाला तरी छाती फुटेपर्यंत आंदोलने केली आहेत, केसेस अंगावर घेतल्या आहेत. मला नको पण सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी द्या, सामान्य शिवसैनिकावर अन्याय करु नका, अशी विनंती त्यांनी केली. पण त्यांचे हेच भाषण व्हायरल होताच अवघ्या दोन दिवसांतच त्यांची जिल्हाप्रमुखपदावरुन हकालपट्टी केली. त्यांच्या हकालपट्टीवरुनच शेट्टी महाविकास आघाडीत येत असल्याचे जवळपास निश्चित झाले.