Download App

“दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे माझ्याकडे आले अन्..”; स्वबळाच्या संकेतावर पवारांचं सूचक विधान

महापालिका निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे फार टोकाची भूमिका घेतील असे मला वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.

Sharad Pawar on Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुका स्वबळावर लढाव्यात असा सूर महाविकास आघाडीतून निघू लागला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची याबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट नसली तरी ठाकरे गटाकडून मात्र तशी तयारी सुरू झाली आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल अंधेरीतील क्रीडा संकुलात आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे एकदम टोकाची भूमिका घेतली असे मला वाटत नाही असे शरद पवार म्हणाले (Sharad Pawar) आहेत.

उद्धव ठाकरेंच्या पक्षात आणखी फूट पडणार? राजकीय भूकंपाच्या दाव्यावर पवारांचा फुलस्टॉप!

शरद पवार यांनी आज सकाळी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी पत्रकारांनी त्यांना उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेविषयी विचारलं असता पवार म्हणाले, दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माझ्याकडे आले होते. आमच्यात या मुद्द्यासह अन्य मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी काल त्यावर भाष्य केलं. हे त्यांचं मत आहे. मात्र त्यासाठी आता उद्धव ठाकरे फार टोकाची भूमिका घेतील असं मला वाटत नाही.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल दोन गटांचे मेळावे झाले. बीकेसीमध्ये शिंदेसेनेचा तर अंधेरीत ठाकरे गटाचा मेळावा झाला. उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला तुलनेने जास्त गर्दी होती असे पवार म्हणाले. ठाकरे गटातील नेते कार्यकर्ते, पदाधिकारी जे बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत ते आता शिंदे गटात जातूील असे मला वाटत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतंत्र लढण्याच्या विचारात असतील तर त्याविषयी महाविकास आघाडीत सामंजस्याने विचार करण्यात येईल असेही शरद पवार म्हणाले.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी दिले. आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. मी सर्वांशी चर्चा करत आहे. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या महापालिकांमधील आपल्या पदाधिकाऱ्यांशी तिथल्या नेत्यांशी बोलणं झालं आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे की एकटं लढा. अमित शाह परत उद्या येत आहेत. त्यांचा समाचार तर घेणार, मी सोडणार नाही. पाठीत वार केला की वाघ नखं काढू. मिठी मारली तर प्रेमाने मारू. दगाबाजी केली तर वाघनखं काढू. हा महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्राची शिकवण आहे, असं ठाकरे या मेळाव्यात म्हणाले होते.

शिवसेनाप्रमुख समितीतून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा; शिंदेसेनेचा ठराव, फडणवीसांची कोंडी?

follow us