सातारा : मुलाच्या प्रेमसंबंधामुळे जात पंचायतीकडून जवळपास 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचा प्रकार सातारा जिल्ह्यातील पुसेगाव इथं घडला आहे. कुटुंबाला दंड ठोठावण्यापासून ते सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी जातपंचायतीच्या एकूण 5 जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नेमकं प्रकरण काय?
साताऱ्यातील पुसेगावतील रहिवासी असलेल्या माधुरी धनु भोसले यांच्या मुलाचं एका महिलेशी प्रेमसंबंध होते.
या प्रेमप्रकरणाबद्दल पारधी समाजाच्या पंचमंडळींना समजल्यानंतर जातपंचायतीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भोसले कुटुंबाला एकूण 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.
जात पंचायतीने ठोठावलेला दंड न भरल्यास भोसले कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची धमकी दिल्याचं माधुरी भोसले यांनी तक्रारीत म्हंटलंय.
समाजाच्या लोकांनी आपल्यावर दबाव टाकल्याने हातावर पोट भरणाऱ्या माधुरी भोसले यांनी कर्ज काढून कसेबसे 80 हजार रुपये दिले.
उर्वरित बाकी रक्कम एक लाख रुपये भोसले कुटुंबियांनी देण्यासाठी पंचांमार्फत जात पंचायत भरवण्यात आली. यासंदर्भात अंनिसकडे तक्रार आल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली.
अंनिसकडून याबाबत पुसेगाव पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मधल्या काळात जात पंचायतीच्या पंचांकडून माधुरी भोसले आणि त्यांच्या मुलीला पंचांकडून चाकूने मारहाण करण्यात आल्याचं देखील तक्रारीत म्हंटलंय.
दरम्यान, या प्रकरणी माधुरी भोसले यांच्या तक्रारीनूसार मतन लक्ष्मण शिंदे, लाव्हाऱ्या ल. शिंदे, विकास मिन्या शिंदे, साजन किर्लोस्कर शिंदे, इंद्रा चंद्रकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनात एपीआय संदीप शितोळे अधिक तपास करीत आहेत.