आम्हाला संधी द्या.., तुमचा कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही; मुख्यमंत्र्यांचं सांगलिकरांना आश्वासन
सांगलीच्या महानगरपालिका प्रचारात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आश्वासन उपस्थित असलेल्या नागरिकांना दिली.
सांगलीची वारणा उद्भव योजना आली आहे त्या योजनेला मंजुरी देऊ. (Sangli) सांगलीकरांना स्वच्छ पाणी देऊ. सांगली महापालिका इमारत जुनी झालीय. भाजपचा झेंडा महापालिकेवर लागला की, महापालिकाच्या नवीन इमारतीलाही मंजुरी देऊ. सांगली महापालिका भाजपकडे निवडून द्या, शहरातील कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीकरांना दिला आहे. ते महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, आज प्रचाराचा शुभारंभ सांगलीतून करतोय याचा आनंद आहे. एकदा मोदी म्हणाले, सांगली चांगली म्हणून आज भाजप पक्षाचा प्रचार शुभारंभ सांगलीमधून करत आहे. मागे सभा घेतल्यावर काही आश्वासन दिली होती, विकास करून दाखवा असं म्हटलं होतं. जी जी आश्वासन दिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
सांगली, कोल्हापूरच्या पुरावर वर्ल्ड बँकेच्या मदतीने कायमस्वरूपी उपाय काढला. 591 कोटी रुपये यासाठी उपलब्ध करून दिले. ते म्हणाले की, वाहून जाणारे पाणी शहरात न येता दुष्काळी भागाकडे आणि मराठवाडाकडे वळवू. ते म्हणाले की, देशाची वाटचाल 70 वर्ष एकच भूमिका होती भारत हा गावात राहतो, गावचा विकास म्हणजे देशाचा विकास, पण शहर आहेत हे आपण विसरलो, आज शहराच्या गरजा वाढत आहेत.
सांगली महापालिकेसाठी 100 कोटींचे रस्ते, 105 कोटींच्या पाणी योजना, 253 कोटींची ड्रेनेज योजना, 89 कोटींचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, शहरातील एलईडी लाईट साठी 60 कोटी, शंभर फुटी रस्ता व काळी खण विकासासाठी 18 कोटी दिला असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
