मी देवेंद्र फडणवीसांना खासगीत नेहमी सांगायचो साहेब, थोडा विचार करा; रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने खळबळ
रवींद्र चव्हाण यांच्याकडून पिंपरी-चिंचवडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर.
Pimpri Chinchwad Election 2026 BJP Ravindra Chavan : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विचार करावा, असा सल्ला आपण याआधीच दिला होता, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण(Ravindra Chavan) यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘अजित पवार(Ajit Pawar) यांना सोबत घेत असताना मी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) साहेबांना खासगीत नेहमी सांगायचो’ ‘साहेब, थोडा विचार करा.’ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्ते आजही मला रोज भेटून याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. ही मंडळी कशा पद्धतीने आपल्या सोबत जोडली गेली आहेत, हे सर्वांना माहिती आहे.’
शुक्रवारी अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपकडून प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र या आरोपांवरून स्थानिक पातळीवर भाजपचा एकही नेता पुढे येत नसल्याने ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तत्त्वांवर चालणाऱ्या भाजपच्या प्रतिमेबाबत शंका उपस्थित झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अखेर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट पिंपरी-चिंचवडमध्ये येत अजित पवारांच्या आरोपांचा समाचार घेतला.
रवींद्र चव्हाण हे अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका करताना म्हटले, ‘अजित पवार हे व्यक्तिशः चांगले आहेत, पण काही एजन्सी त्यांना खोटं नरेटिव्ह कसं पसरवायचं यासाठी स्क्रिप्ट लिहून देतात. अजितदादांनी कोणता शर्ट घालायचा याचाही सल्ला एजन्सीकडून घेतला जातो. एजन्सींच्या सल्ल्याशिवाय अजित पवार असे खोटे आरोप करणार नाहीत.’
Lakshman Hake : ओबीसी आरक्षणासाठी नेमकं काय केलं? लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांवर हल्लाबोल
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यामुळेच ते असे आरोप करत असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. ‘केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवत आहे. ‘मी ना खाऊंगा, ना किसी को खाने दुंगा’ या तत्त्वावर सरकार चालते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनी कोणतीही चिंता करू नये,’ असे ते म्हणाले.
निवडणूक संपल्यानंतर अजित पवार स्वतःच हसत-हसत सर्व आरोप मागे घेतील, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला. ‘भाजपची संघटनात्मक ताकद पिंपरी-चिंचवडमध्ये भक्कम आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला गती मिळाली आहे. येथील मतदार सुज्ञ असून विकासासाठी मतदान करतील आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचाच महापौर बसेल,’ असा ठाम विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
