सोलापूर : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने (BJP) उमेदवारांची पाचवी यादीही जाहीर केली. यात सोलापूर (Solapur Loksabha) मतदारसंघातून माळशिरसचे (Malshiras) आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सोलापूरमध्ये काँग्रेसच्या (Congress) प्रणिती शिंदे (Praniti Shinde) विरुद्ध भाजपचे राम सातपुते अशी लढत होणार आहे. याच लढतीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांचे स्वागत करणारे पत्र लिहिले आहे. मात्र या पत्रातील एका वाक्यावरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
मा. राम सातपुते जी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे! सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते.
तसंच ह्या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळाली आहे त्या बद्दल शुभेच्छा देते.
लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे. पुढील 40 दिवस याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते ..
सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापूरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते.
– प्रणिती सुशीलकुमार शिंदे
@RamVSatpute जी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणुक रिंगणात स्वागत आहे! pic.twitter.com/ZQHXT7aLAE
— Praniti Shinde (@ShindePraniti) March 25, 2024
असे पत्र प्रणिती शिंदे यांनी लिहिले. मात्र यातील “तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचे सोलापूरात स्वागत करते” या एका वाक्यावरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पत्रातील या वाक्यातून शिंदे यांनी नकळतपणे राम सातपुते हे बाहेरचे उमेदवार आहेत हे ठसवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. वास्तविक सातपुते सोलापूर जिल्ह्यातीलच माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र त्यांचा मतदारसंघ लोकसभेला माढा मतदारसंघात येतो. त्यामुळेच प्रणिती शिंदे यांनी यांनी “इथला असो की बाहेरचा” असे म्हंटल्याचे बोलले जाते.
दरम्यान, प्रणिती शिंदे यांच्या या पत्राला राम सातपुते यांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी उलट पत्र लिहुन आपण सोलापूरमधीलच असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
सातपुतेंनी आपल्या पत्रात म्हंटले की,
आ. प्रणिती शिंदेजी, जय श्रीराम…!
मी 2019 पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे. मी आमदार झाल्यापासून ते आजतपर्यंत मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केला आहे.
मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्षं राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखल आहे.
.@ShindePraniti ताई, जय श्रीराम! आपण केलेल्या स्वागताबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..!
गेल्या ५ वर्षांत माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ज्या पद्धतीने मेहनत केली आहे त्याचं पध्दतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील!
माझ्याही आपणांस खूप खूप शुभेच्छा! pic.twitter.com/zz2TTTL2Jh
— Ram Satpute (@RamVSatpute) March 25, 2024
राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन.
वंदे मातरम्…!
आपला विनीत, राम सातपुते
एकूणच या दोन पत्रांवरुन सातपुते यांची उमेदवारी जाहीर होताच प्रचाराचा शुभारंभ झाला असल्याचे दिसून येत आहे.