Ram Satpute vs Ranjitsinh Mohite Patil : बीडचे पार्सल बीडला परत पाठवू, आमच्यात हिम्मत आहे, असा सज्जड इशारा धैर्यशील मोहिते यांनी लोकसभा निवडणुकीत राम सातपुतेंना (Ram Satpute) दिला होता. सातपुते हे लोकसभेपाठोपाठ विधानसभेला पराभूत झाले. खासदार धैर्यशील मोहितेंनी आपला शब्द खरा करून दाखविला. दोन्ही पराभव सातपुतेंच्या जिव्हारी लागलेत. तेव्हापासून ते मोहिते कुटुंबाविरोधात आक्रमक भूमिका घेतायत. रणजितसिंह मोहिते (Ranjitsinh Mohite Patil) हे त्यांच्या रडारवर आहेत. भाजपकडून (bjp) ते विधानपरिषदेवर आहेत. रणजितसिंह मोहिते यांनी दोन्ही निवडणुकीत पक्षविरोधात कारवाई केली. त्यामुळे त्यांची पक्षातून काढून टाका, त्यांची आमदारकी रद्द करा, अशी मागणी करतात. परंतु राम सातपुतेंची मागणीला पक्षातून केराची टोपली दाखविली काय अशी परिस्थिती आहे हे आपण जाणून घेऊया…
नोटीसीला उत्तर पण कारवाई नाही
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपविरोधात काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी राम सातपुते यांनी केलीय. त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले होते. त्यावर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. त्याला मोहिते यांनी उत्तर दिले आहे. या घटनेला अनेक महिने झाले आहे. पण मोहिते पाटील यांच्यावर अद्याप भाजपकडून कारवाई झालेली नाही.
नोटीसनंतर बावनकुळेंकडून मोहितेंचे कौतुक
नोटीस बजाविल्यानंतरही रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानात भाग घेतला. त्यांनी एक हजार सदस्य नोंदविले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहिते यांना पत्र पाठवत कौतुक केले. आपल्या समर्पित योगदानाबाबत पक्षाध्यक्ष म्हणून आदर आणि अभिमान वाटतो, या शब्दात बावनकुळे यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांची प्रशंसा केली. त्याचवेळी रणजितसिंह मोहिते पाटलांवरील भाजपचा राग मावळला आहे का अशी चर्चा सोलापूरात सुरू झाली होती. त्यानंतर मार्च महिन्यात रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव विश्वतेजसिंह यांच्या विवाहाच्या स्वागत समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली होती.
पक्षाच्या बैठकीला ही रणजितसिंह मोहितेंची हजेरी
दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापूरला आले होते. बावनकुळेंनी पक्षाची बैठक घेतली. त्या बैठकीला रणजितसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते. मोहिते पाटील यांच्यावरील कारवाईबाबत पत्रकारांनी बावनकुळे यांना प्रश्न विचारला होता. एखाद्या विधानसभा अथवा विधान परिषद सदस्यावर शिस्तभंगाची कारवाई करायची असेल, तो निर्णय केंद्रीय भारतीय जनता पक्षाकडून घेतला जातो. भाजपच्या केंद्रीय अनुशासन समितीने लोकांच्या तक्रारी, त्यांचं जे काही म्हणणं आहे, ते ऐकून घेतले आहे. त्यावर योग्य तो निर्णय होईल. अनुशासन समितीला जे काही आढळेल, त्यानुसार समिती निर्णय घेईल, असे बावनकुळे यांनी सांगून टाकले.
भाजपने रणजितसिंहांना पक्षात का ठेवले ?
मोहिते पाटीलसोबत असते तर भाजपला सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभेच्या जागा जिंकता आल्या असत्या, याची जाणीव भाजपला झालीय. त्यामुळे मोहिते पाटील यांना थेट पक्षातून काढण्याबाबत विलंब होत असल्याचे देखील बोलले जातंय. रणजितसिंह मोहिते पाटील वगळता बाकी सर्व मोहिते हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. रणजितसिंह यांनी देखील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपशी जुळवून घेण्याचे ठरवलेले दिसून येतंय. त्यांचे कारखान्याचे अडचणीत असताना अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर मदत केली होती. आता त्यांच्यापासून दूर झाल्यास पुन्हा वेगळी कारवाई होण्याचा धोका देखील मोहिते यांना वाटतोय. त्यामुळे मोहिते हे भाजपाला बसून आहेत. तर भाजप देखील त्यांचा योग्य प्रकारे कसा वापर करता येईल याच्या विचारात आहे. त्यामुळे राम सातपुते स्थानिक पातळीवर मोहिते पाटलांना शिव्या देत असले तरी राज्य पातळीवर फडणवीस यांनी मोहितेंना सध्या तरी अभय दिल्याचे दिसून येत आहे.