Download App

ठरलेलं ते घडलंच! सांगलीत काँग्रेसला धक्का, जयश्री पाटलांचा भाजपात प्रवेश..

सांगलीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्री पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Sangli Politics Jayshree Patil Joins BJP : राज्यात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती (Sangli Politics) लागली आहे. काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवार गटातील अनेक दिग्गजांनी महायुतीची वाट धरली आहे. आताही काँग्रेसला (Congress Party) धक्का देणारी बातमी आहे. सांगलीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्री पाटील यांनी (Jayashree Patil Joins BJP) आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशाने सांगलीत भाजपला मोठं बळ मिळालं आहे. तर ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला (Maharashtra Local Body Elections) खिंडार पडलं आहे.

जयश्री पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा आहेत. माजी दिवंगत मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आहे. जयश्री पाटील सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील मोठ्या नेत्या आहेत. आता याच जयश्री पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी ही घडामोड घडली आहे. मोठा नेता ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा नेता पक्षात आल्याने सांगलीत भाजपला ताकद मिळाली आहे. तर काँग्रेसच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, भाजपला सांगली जिल्ह्यात चांगलं यश मिळालं आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी अजून चांगली मंडळी जी वेगवेगळ्या पक्षांत आहेत पण त्यांना तिथे न्याय मिळत नाही. त्यांना सोबत घेऊन मजबूतीने काम वाढवलं पाहिजे असा विचार होता.

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; वसंतदादा पाटलांची नातसून भाजपमध्ये प्रवेश करणार

आज जयश्रीताई यांनी भाजपात प्रवेश केला. माझी ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा झाली त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की माझ्या पक्षप्रवेशावेळी तुम्ही आलंच पाहिजे. खरंतर मुख्यमंत्री पक्षप्रवेशाच्या फारसे हजर राहत नाहीत. आपल्याकडे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीतच प्रवेश होतात. पण मला वाटलं की वसंतदादांच्या घराण्यातील जयश्रीताईंचा पक्षात प्रवेश होतो आहे तेव्हा आपण हजर राहिलं पाहिजे असा विचार आला. त्यामुळे मी सुद्धा या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यावेळी म्हणाले.

आधीच सगळं ठरलं होतं

जयश्री पाटील या काँग्रेसमध्ये होत्या. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. भाजप नेते व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांची सोमवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी भाजप आमदार सुधीर गाडगीळ, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजप नेते शेखर इनामदार, सी. बी. पाटील आणि जनसुराज्य पक्षाचे सुमित कदम आदी उपस्थित होते.

स्थानिक विकास, सहकार आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. पण ही भेट भाजप पक्षप्रवेशाबाबत होती. दोन्ही नेत्यांत यांच्यात पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली. त्यानंतर जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे मान्य केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला हा मोठा धक्का आहे.

follow us