Sangli News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेकांनी पक्षांतरं केली. अनेकांचा हा प्रयोग यशस्वी ठरला मात्र असेही काही नेते होते ज्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर पक्षांतर केलेल्या या नेतेमंडळींत अस्वस्थता वाढू लागली आहे. या अस्वस्थतेतूनच त्यांनी पुन्हा घरवापसी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये सांगलीचे (Sangli News) माजी खासदार संजय काका पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. संजय पाटील पुन्हा भाजपात येतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) सांगली मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला होता. या निवडणुकीत ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना तिकीट दिलं होतं. तर महायुतीने संजय पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण, बंडखोरी करत काँग्रेसच्या (Congress Party) विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी केली आणि विजय मिळवला.
यानंतर सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत संजय पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवार गटाचे उमेदवार आणि दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली. मात्र याही निवडणुकीत संजय पाटील पराभूत झाले. आता संजय पाटील पुन्हा भाजपात वापसी करतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
संजयकाका पाटील अन् विशाल पाटील भिडले; तासगावमध्ये जाहीर सभेत जोरदार राडा
विधानसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतु, त्यांना येथील वातावरण मानावल्याचं दिसत नाही. त्यामुळे संजय काका लवकरच अजितदादांची साथ सोडतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी संजय पाटील यांनी भाजप सदस्य नोंदणी अभियानासाठी पूर्ण ताकदीनं करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे ते लवकरच अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, संजय पाटील यांनी याबाबत अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.