Download App

संजय मंडलिक ‘कमळावर’ लढणार? कोल्हापूर घेत भाजपने कल्याणचा दावा सोडल्याची चर्चा

कोल्हापूर : शिवसेना खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडण्याच्या बदल्यात कोल्हापूर लोकसभेची जागा भाजपकडे गेली आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे. (shivSena Sanjay Mandlik bjp Kolhapur Lok Sabha constituency)

भाजपने सध्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा, उमेदवारांची चाचपणी, मतदारसंघात प्रभारींची घोषणा केली आहे. भाजपने कोल्हापूरमध्येही मागील काही दिवसांपासून जोरदार ताकद लावली आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे या जागेची जबाबदारी दिली आहे. कोल्हापूरमधील उत्तरच्या विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपने लक्षणीय मत घेतली होती. यामुळे लोकसभेच्या जागेवर भाजप आपला हक्क सांगण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

अमित शाहंपर्यंत गेलेला वाद… पडदा पडताच श्रीकांत शिंदेंनी ठरवला लोकल लेव्हलचा

दरम्यान, याबाबत बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो. भाजपने आम्हाला योग्य तो सन्मान दिला. आम्ही भाजपचे सैनिक आहोत, भाजपचे नेते जो काही आदेश देतील तो आम्ही पाळू. यातून जर कोल्हापूरची जागा भाजपला मिळाली आणि संजय मंडलिक भाजपमध्ये आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली तर आम्ही त्या पद्धतीने काम करू. त्यांनी 2019 मध्ये आमचा पराभव केला म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही असा कोणताही किंतु परंतु न ठेवता आम्ही त्यांचा प्रचार करू, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूरमध्ये शिवसेनेची ताकद घटली?

2014 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 10 मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे 6 आमदार होते. मात्र 2019 मध्ये प्रकाश आबिटकर वगळता सर्व आमदार पराभूत झाले. काँग्रेसने मोठी उसळी घेत कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, करवीर या विधानसभा मतदारसंघातून 4 आमदार निवडून आणले. याशिवाय कागल आणि चंदगडमधून राष्ट्रावादीचे आमदार निवडून आणण्यासाठीही काँग्रेसने मोठा हातभार लावला. सध्याच्या स्थितीतमध्ये यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये येत असलेल्या कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, कागल आणि चंदगड या विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. केवळ राधानगरी मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. अशात बंडामुळे शिवसेनेची ताकद दोन गटांमध्ये विभागली गेली आहे.

CM सुप्रियाताई अन् DCM आदित्य; ठाकरेंचा मास्टर प्लॅन बावनकुळेंनी केला उघड

महापालिका, जिल्हा परिषदेमध्येही शिवसेनेची फारशी ताकद नाही. 2019 मध्ये सतेज पाटील यांच्या मदतीने ‘आमचं ठरलयं’ म्हणतं मंडलिकांचा विजय सोपा झाला होता. पण आता काँग्रेसची ताकद वाढल्याचे चित्र आहे. मतदारसंघात काँग्रेसची वाढलेली ताकद आणि घटलेली शिवसेनेची ताकद हे समीकरण त्रासदायक ठरु शकते. त्यामुळेच इथून भाजपने जोर लावल्याचे दिसून येत आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर संजय मंडलिक भाजपच्या चिन्हावर उभे राहिल्यास त्यांचा विजय सोपा होण्यास मदत होऊ शकते, असे आडाखे बांधले जात आहेत. शिवसेनेची मते, संजय मंडलिकांचा जनसंपर्क, भाजपची अन् खासदार धनंजय महाडिकांची ताकद, मदत आणि रसद या सर्व गोष्टी संजय मंडलिकांसाठी जमेच्या बाजू ठरु शकतात.

Tags

follow us