Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Solapur DCC Bank Election) निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh mohite patil) यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Patil) यांनीही निवडणुकीतून माघार घेतलीय. त्यामुळे मोहिते-पाटील कुटुंबातील आणखी एका प्रमुख नेत्याने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
दोन्ही गटातून खासदार धैर्यशील मोहिते यांची माघार
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कृषी पणन प्रक्रिया संस्था आणि इतर शेती संस्था अशा दोन्ही गटांतून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांनी आता दोन्ही गटांतील आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे मोहिते-पाटील कुटुंबाकडून आता त्यांचे बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील हेच निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज अद्याप कायम आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी आणखी कोणते उमेदवार माघार घेतात आणि निवडणुकीचे अंतिम चित्र कसे स्पष्ट होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय; सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात सुधारणा होणार
सहा माजी संचालकांचे अर्ज बाद, उच्च न्यायालयाचाही दिलासा नाही
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसला आहे. माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह दिलीप माने, जयंतराव जगताप, संजयमामा शिंदे, सुरेश हसापुरे आणि बबनराव आवताडे या सहा माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले होते. या निर्णयाविरोधात संबंधित उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानेही सहा माजी संचालकांचे अपील फेटाळून लावले. त्यामुळे त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता आले नाही.
मोहिते-पाटील कुटुंबातील राजकीय समीकरणे चर्चेत
एकीकडे रणजितसिंह मोहिते पाटील यांचा अर्ज बाद झाला, तर दुसरीकडे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वतःहून दोन्ही गटांतील उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे. मोहिते-पाटील कुटुंबातील दोन प्रमुख नेत्यांच्या निवडणुकीतील अनुपस्थितीमुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
