फडणवीसांची भेट घेऊन मोहिते पाटलांची जोरदार फिल्डिंग, तरीही रणजितसिंहांच्या उमेदवारीवर सस्पेन्स कायम
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Mohite Patil’s strong fielding : महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीबाबत मोठी हालचाल सुरू झाली असून, इच्छुकांची लगबग वाढली आहे. सहा जागांसाठी निवडणूक होणार असल्याने पक्षातील अनेक नेते सक्रिय झाले असून, आपल्या नावासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा जोर धरत आहे. याचदरम्यान एक महत्वाची राजकीय घडामोड समोर आली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीमागे त्यांचे चिरंजीव आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पुन्हा एकदा विधानपरिषदेत संधी मिळावी,हा मुख्य हेतू असल्याचे बोलले जात आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपत असल्याने ही भेट विशेष महत्वाची मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विजयसिंह मोहिते पाटील यांची राजकीय भूमिका बदलल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या जवळ गेल्याचे संकेत मिळत होते. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा रंगली आहे.
मंत्रालयातील या भेटीदरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पाय पडल्याची घटना देखील चर्चेचा विषय ठरली. दुसरीकडे भाजपकडून यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती आखली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. माढा लोकसभा निवडणुकीतील पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का ठरला होता. धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणजितसिंह निंबाळकर यांचा पराभव केला होता. या पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध वाढल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात जयकुमार गोरे, राम सातपुते आणि रणजितसिंह निंबाळकर यांना बळ दिल्याचे देखील दिसून येत आहे.
भाजपात प्रवेश करणार का? मतदानाचा हक्क बजावत तनपुरे स्पष्टच म्हणाले
दरम्यान, भाजपच्या नव्या रणनीतीनुसार सहा जागांपैकी किमान दोन जागा महिलांना देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुकांची उत्सुकता वाढली असून, अनेकांचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांना विधानपरिषदेवर संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र मर्यादित जागांमुळे सर्वांना संधी मिळणे कठीण असल्याचे स्पष्ट होत आहे.
पक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कामगिरी करणाऱ्या, मात्र अद्याप आमदार न झालेल्या नेत्यांना देखील संधी देण्याच्या विचारात आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रमुख नावे समोर येत आहेत. याचदरम्यान प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. याशिवाय माधवी नाईक, अर्चना पाटील चाकूरकर, संजयकाका पाटील, संजय केणेकर आणि विवेक कोल्हे यांची नावे देखील चर्चेत आहेत. एकंदरीत, विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली असून, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.