Solapur : शेतकऱ्यांचे विजेचे बिल दुरुस्त करून द्यावे, वीज वितरण कार्यालयाने शेतकऱ्यांचे वीज तोडण्याचे काम तत्काळ थांबवावे यांसह अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उद्या राज्यभर चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने १२ वाजता आंदोलन होणार आहे. पोलिसांनी जर आंदोलन करू दिले नाही तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी दिला.
शेट्टींच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. वीज दरामधील संभाव्य 37 टक्के दरवाढ आम्हाला मान्य नाही. फक्त पाच जिल्ह्यांमध्ये दिवसाच्या वेळी वीज दिली आहे. संपूर्ण राज्यात वीजपुरवठा (Electricity Supply) करावा. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केल्यामुळे जंगली जनावरे आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष होतो त्यात शेतकऱ्यांचा बळी जातो, असे ते म्हणाले.
हे वाचा : महावितरणाला राजू शेट्टींनी दिला दम, म्हणाले ; शेतकऱ्यांचा करंट तुम्हाला सोसणार नाही
शेतकऱ्यांकडून शक्यतो 50 टक्केच वीज वापरली जाते. बाकीची वीज चोऱ्या आणि नुकसानीत वाया जाते. सोलापूरसह सातारा, कराड, खटाव, फलटण या ठिकाणी चक्का जाम करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा यांसह अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन होईल. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. पीक विमा देत असताना विमा कंपन्या शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचे त्यांनी सांगितले.
Raju Shetti : रावणाने धनुष्य उचललं, पण मतदार श्रीरामाच्या रूपात येतील
सुरत चेन्नई राष्ट्रीय महत्वकांक्षी महामार्ग होणार आहे. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून, त्यांना किती मोबदला द्यावा लागणार याची माहिती दिली गेली नाही.शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने मोजणे त्यावर हद्दी फिक्स करणे अशा पद्धतीचे काम महसूल,राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने होत आहे ते काम आम्ही बंद पाडणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर सुरत चेन्नई राष्ट्रीय महत्वकांक्षी महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.