महावितरणाला राजू शेट्टींनी दिला दम, म्हणाले, ‘शेतकऱ्यांचा करंट तुम्हाला सोसणार नाही’
कोल्हापूर : राज्यातील सर्व ग्राहकांपर्यंत वीज पोहोचविण्यासाठी महावितरणाला सरासरी 7 रुपये 35 पैसे प्रति युनिट इतका खर्च येतो. पण शेतकऱ्यांना केवळ दीड रुपया प्रती युनिट दराने वीजपुरवठा केला जातो. म्हणजे शेतकऱ्यांना मूळ खर्चाच्या ऐंशी टक्के सवलत दिली जाते, अशी माहिती महावितरणचे (Mahavitaran) व्यवस्थापकीय अध्यक्ष विजय सिंघल (Vijay Singhal) यांनी दिली आहे. यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी जोरदार टीका करत महावितरणाचा भांडाफोड केला आहे.
शेतकऱ्यांना जादा शहाणपण शिकविण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा अजून बऱ्याच भानगडी माझ्याकडे आहेत. त्यासाठी मुंबईतील प्रकाशगड समोर घोंगडे टाकून हिशोबाला बसूया, मग समजेल कोण किती पाण्यात आहे ते ?, असा इशारा राजू शेट्टी यांनी महावितरणाला दिला आहे
मागील काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. राजू शेट्टी यांनी एक ट्विट करत महावितरणाला इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, महावितरणचे सिंघल हे राज्यातील शेतकऱ्यांना 7 रूपये 35 पैसे दराने तयार होणारी वीज 1 रूपये 50 पैसे दराने देवून 85 टक्के सवलत देत असल्याचा बागलबुवा करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
शेट्टी म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी व घरे संपादित करून धरणे बांधून त्याठिकाणी जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या विद्युत प्रकल्पातून तयार होणाऱ्या प्रतियुनिट वीजेचा खर्च २५ ते ५० पैसे इतका आहे. हे प्रकल्प खाजगी लोकांना चालविण्यास दिले जात असून 50 पैसे युनिटने तयार होणारी वीज त्यांच्याकडून 3.50 पैसे ते 5.50 पैसे दराने वीज खरेदी करून ग्राहकांच्या माथी 8 रूपयाने मारली जात असल्याचं शेट्टीचं यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे.
विजय सिंघल शेतक-यांचा करंट तुम्हाला सोसणार नाही !
महावितरणचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक विजय सिंघल हे राज्यातील शेतक-यांना ७ रूपये ३५ पैसे दराने तयार होणारी वीज १ रूपये ५० पैसे दराने देवून ८५ टक्के सवलत देत असल्याचा बागलबुवा करत आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेतक-यांच्या जमीनी व
— Raju Shetti (@rajushetti) February 19, 2023
त्यांनी पुढे लिहिले की, महावितरणची वीज वितरण गळती प्रत्यक्षात 30 टक्के आहे आणि शेती पंपांचा खरा वीज वापर 15 टक्के आहे. पण कागदोपत्री बनवाबनवी करून राज्य सरकारला सांगितले जाते की शेतीपंपांची वीज वापर 30 टक्के आहे आणि गळती पंधरा टक्के आहे. प्रत्यक्षात शेती पंपांची बिले दुप्पट करून शेती पंप वीज वापर 30 टक्के दाखविला जात आहे व मंत्रीमंडळाचीही दिशाभूल केली जात आहे. हा प्रकार गेली 10 वर्षे सातत्याने सुरू आहे व तो आम्ही संबंधित प्रत्येक सरकारच्या निदर्शनास आणला आहे.
Sanjay Raut ना ‘ते’ वक्तव्य भोवणार ? ; शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांने दिला इशारा
शेती पंप वीज वापर या नावाखाली लपविलेली ही अतिरिक्त पंधरा टक्के गळती म्हणजे दरवर्षी किमान 12 हजार कोटी रुपयांची चोरी व भ्रष्टाचार आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा नियोजन मंडळातून आयपीडीएस योजनेअंतर्गत 5 कोटी रूपयाचे एक काम एका ठेकेदाराने 3 टक्के कमी दराने भरणाऱ्या ठेकेदाराला थांबवून 12 टक्के जादा दराने निविदा भरलेल्या ठेकेदारास हे टेंडर देण्यास तेथील पालकमंत्री व अधिक्षक अभियंता संबधित ठेकेदारावर निविदा माघार घेण्यास दबाव आणत आहेत. या दोन्ही कंपन्यांमधील भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि नियोजनाचा अभाव यामुळे महावितरण तोट्यात जात आहे. याबद्दल बोलायला सिंघल यांची दातखीळी बसली आहे काय ? असा संतप्त सवालही शेट्टी यांनी महावितरण प्रशासनाला केला आहे.