मोठी बातमी, आजपासून ‘या’ 12 राज्यांमध्ये सुरू होणार एसआयआर ; जाणून घ्या सर्वकाही
Election Commission On SIR : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून देशाच्या राजकारणात चर्चेत असलेला विशेष सघन सुधारणा म्हणजेच एसआयआर
          Election Commission On SIR : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून देशाच्या राजकारणात चर्चेत असलेला स्पेशल इंटेंसिव रिव्हिजन म्हणजेच एसआयआर आजपासून देशातील 12 राज्यांमध्ये सुरु होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून देशातील 9 राज्यांमध्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये एसआयआर होणार आहे. या प्रक्रियेत 51 कोटी मतदारांचा समावेश असणार आहे. या प्रक्रियेचा उद्देश मतदार यादी अपडेट करणे आणि पात्र मतदारांचा समावेश करणे तसेच मतदार यादीत कोणतीही नावे वगळली जाणार नाही किंवा नावांची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करणे आहे असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
या 12 राज्यांमध्ये एसआयआर
भारतीय निवडणूक आयोगाचे (Election Commission) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांनी 27 ऑक्टोबर 2025 रोजी देशव्यापी एसआयआरची (SIR) घोषणा केली होती. यानुसार ही प्रक्रिया 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत चालणार आहे. मतदार यादीचा प्रारूप 9 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल आणि अंतिम मतदार यादी 7 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध होईल. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गोवा, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तर अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या तीन केंद्रशासित प्रदेशामध्ये आजपासून एसआयआर सुरु होणार आहे.
संपूर्ण SIR प्रक्रिया वेळापत्रक
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, एसआयआरची प्रक्रिया 4 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू होईल आणि 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात, 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत, सर्व 12 राज्यांमधील बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLOs) आणि रिटर्निंग ऑफिसर्स (ROs) यांना प्रशिक्षण देण्यात आले आणि एसआयआर करण्यासाठी आवश्यक साहित्य वाटण्यात आले. 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत, BLOs घरोघरी जाऊन विद्यमान मतदार यादीची पडताळणी करतील. नवीन मतदार जोडले जातील आणि बनावट मतदार काढून टाकले जातील. 9 डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, ज्यावर लोक त्यांचे आक्षेप आणि दावे सादर करू शकतील. नावे जोडण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, 7 फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
श्री महावतार बाबाजींच्या कार्याची महती सांगणारा ‘फकिरीयत’…, 28 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित
एसआयआरसाठी 13 कागदपत्रे आवश्यक
एसआयआरसाठी तुम्ही हे 13 कागदपत्रे दाखवू शकता: जन्म प्रमाणपत्र, दहावीच्या परीक्षेचा दाखला, पासपोर्ट, सरकारी जमीन/घराची कागदपत्रे, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, सरकारी नोकरी ओळखपत्र किंवा पेन्शन ऑर्डर, कुटुंब नोंदणीची प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक पासबुक, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा जॉब कार्ड.
