Download App

विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर, व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

  • Written By: Last Updated:

शिर्डी : अमरावतीहून शिर्डीला सहलीसाठी आलेल्या ९४ विद्यार्थ्यांसह ५ शिक्षकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री जेवण केल्यानंतर अचानक उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe-Patil) यांनी एकाच व्हिडिओ कॉलद्वारे बाधित विद्यार्था-शिक्षकांशी संवाद साधला. या रूग्णांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही, असे रूग्णालय अधीक्षकांनी कळविले आहे‌.

विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रकृतीची सर्वातोपरी काळजी घेण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रितम वडगावे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिल्या आहेत. यावेळी तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील आदर्श हायस्कूलमधील मधील २२७ मुले-मुली व १५ शिक्षक हे दोन दिवसांपूर्वी शैक्षणिक सहलीला निघाले होते. शिर्डीत येण्यापूर्वी त्यांनी काल दुपारी शेवगावजवळ स्वत: बनवलेले जेवण केले आणि त्यानंतर शिर्डीत दाखल होत साईबाबांचे दर्शन घेतले.

KC Venugopal नाना पटोलेंच्या खिशात, पटोलेंना वाचवण्यासाठीच समिती, देशमुखांचा आरोप

मात्र रात्री देवगड येथे मुक्कामी निघाले असताना ८४ मुले व ४ शिक्षकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना शिर्डी येथील साईनाथ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, आज पुन्हा १० मुले व १ शिक्षक यांनाही उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनाही त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.

श्री. साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, साईनाथ रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रितम वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अनंतकुमार भांगे, डॉ.उज्ज्वला शिरसाठ यांचे वैद्यकीय पथक रूग्णांवर उपचार करत आहे. सध्या सर्व मुले व शिक्षकांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कारण नसल्याचे रूग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

दरम्यान, रूग्णालयास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, राहाता तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय घोलप, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोकुळ घोगरे यांनी भेट देऊन रूग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

उपचार घेत असलेले शिक्षक राजेश पुरी यांनी सांगितले की, साईनाथ रूग्णालय प्रशासन आमची योग्य ती काळजी घेत आहे. आमच्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कारण नाही. स्थानिक प्रशासनामार्फत आम्ही दर्यापूर (जि.अमरावती) प्रशासनाशी व मुलांच्या नातेवाईकांशी संपर्कात आहोत, असं सांगितलं.

Tags

follow us