उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील (Baramati) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीत तसं घटत आहे. आज राष्ट्रवादीच्या होणाऱ्या बैठकीत त्यावर निर्णय होतो की नवीन काही ट्विस्ट समोर येतो हे पाहावं लागणार आहे. या घडामोडी सुरू असतानाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चाही जोर धरत आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या 10 बैठका झाल्या होत्या. येत्या 12 तारखेला दोन्ही पक्ष एकत्र येणारही होते. त्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनाही होती, असं सांगितलं जात आहे. मात्र, आज छगन भुजबळ यांनी एक वाक्य वापरल्याने राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं. पण भाजपसोबत जाण्याचा काही प्रस्ताव नव्हता, असं शरद पवार यांनी म्हटल्याचं मीडियाने छगन भुजबळ यांना विचारलं. त्यावर मला या प्रश्नावर काही बोलायचं नाही. विलिनीकरणा संदर्भात मी काही ऐकलं नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. भुजबळ यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
सुनेत्रा पवार शपथविधीसाठी मुंबईत, तर पार्थ पवारांची शरद पवारांच्या बैठकीला हजेरी
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात हे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्याच लोकांच्या मनात नाही का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. भुजबळ यांच्या या विधानाने राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार नसल्याचे संकेतही मिळत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपमुख्यमंत्रीपद आहे. या पदामुळे पक्षाला बळकट करण्याची शक्ती मिळेल. त्यामुळे हे पद आधी घेणं महत्त्वाचं आहे. आजच्या आमच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्याकडे हे पद दिलं जाईल. त्यानंतर बाकीच्या गोष्टी होतील, असं भुजबळ यांनी म्हटलंय.
सुमित्रा पवार यांना विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री करण हे अतिशय योग्य होईल. मुख्यमंत्री पूर्ण सहकार्य करत आहेत. आजच राज्यपालांना सांगून शपथविधी होईल, असं भुजबळ म्हणाले. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री पद ठरवणं याकडे आमचे पूर्णपणे लक्ष आहे. एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पुढे बाकीचे लोक बसून चर्चा करतील. पुढे काय करायचे आहे ते ठरवतील, असंही ते म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली होती. हे तिन्ही नेते स्वार्थ साधत असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. कोण काय बोलतंय आणि कोण काय बोलतंय हे कळत नाही. एकदा उपमुख्यमंत्री आणि सर्व गोष्टी होऊन जाऊद्या. आपोआप इतरांचं बोलणं बंद होईल. ताईंना उपमुख्यमंत्री करणं हीच आमची प्रायोरिटी आहे, असंही ते म्हणाले.
