आज अजित पवार जिवंत असते, तर…, पत्रकार परिषदेत शरद पवार भावनिक
शरद पवार म्हणाले, अजित पवारांसारखे कर्तृत्ववान नेते सोडून जाणं हा महाराष्ट्रावर सर्वात मोठा आघात आहे. आज ते असते तर फिल्डवर असते.
Sharad Pawar emotional at press conference : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामती येथे दुसरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते अत्यंत भावुक झाले होते. अजित पवार यांच्या नेतृत्वगुणांचे, कार्यपद्धतीचे आणि संघटन कौशल्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले. ‘आज अजित पवार जिवंत असते, तर ते घरी बसले नसते. ते फिल्डवरच काम करत असते,’ असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले.
शरद पवार म्हणाले की, अजित पवार हे अत्यंत कर्तृत्ववान नेते होते. संघटनेत काम करताना त्यांनी नेहमीच सामान्य जनतेशी थेट संवाद साधला. लोकांचे प्रश्न समजून घेणे, त्यांची माहिती घेणे आणि त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हेच अजित पवारांचे वैशिष्ट्य होते. ‘प्रत्येक व्यक्तीचे समाजासाठी काही ना काही योगदान असते. अजित पवार हे अनेक वर्षे संघटनेत सक्रिय राहिले. लोकांच्या प्रश्नांसाठी ते अखंड झटत राहिले. त्यांची कामाची सुरुवात पहाटेच होत असे. काम करताना त्यांनी कधीही कोणतीही कमतरता ठेवली नाही,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसला असून, या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘कर्तृत्ववान व्यक्तीचे जाणे हा संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला मोठा आघात आहे. या दुःखद परिस्थितीला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. लोकांचे दुःख कमी करण्यासाठी आम्हाला अधिक जोमाने काम करावे लागेल. यापुढे नव्या पिढीवर जबाबदारी अधिक वाढली आहे,’ असेही शरद पवार यांनी यावेळी नमूद केले.
