शरद पवार अध्यक्ष असलेल्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात सदस्यांची निवड; 3 एप्रिलला सत्ता समीकरणे ठरणार

शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेच्या निवडणुकीत रविवारी मतदान पार पडले असून आता 3 एप्रिलला कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 36

Election of members to the Mumbai Marathi Book Museum Institute : दादर येथील ऐतिहासिक आणि शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा केलेल्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सर्वसाधारण सदस्यांच्या निवडणुकीकडे यंदा विशेष लक्ष लागले होते. त्यामागचं कारण म्हणजे, या संस्थेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार कार्यरत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेच्या निवडणुकीत रविवारी मतदान पार पडले असून आता 3 एप्रिलला कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे.

या निवडणुकीत संग्रहालयाच्या मध्यवर्ती, नायगाव आणि कांदिवली-आकुर्ली या तीन शाखांमधील 12 जागांसाठी मतदान घेण्यात आले. मध्यवर्ती कार्यालयातून 3 सदस्यांपैकी संजीव भागवत, राजेंद्र कोरडे आणि दिनेश राणे विजयी झाले. विशेष म्हणजे संजीव भागवत यांना 51 पैकी 50 अशी विक्रमी मते मिळाली. नायगाव शाखेतून सुरेंद्र करंबे, संदेश कदम, मकरंद केसरकर अमेय कोंडविलकर, रवींद्र गावडे, जयवंत गोलतकर, सुरेखा भोसले आणि नेहा राणे हे उमेदवार विजयी झाले. तर कांदिवली-आकुर्ली शाखेतून प्रदीप झोरे यांची निवड झाली.

या निवडणुकीत संस्थेच्या विविध शाखांमधून सर्वसाधारण सदस्यांच्या एकूण 40 जागांसाठी प्रक्रिया राबवण्यात आली. त्यापैकी 28 सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित सदस्यांच्या निवडणुकीनंतर आता 3 एप्रिल रोजी 40 सदस्यांमधून कार्यकारिणीची निवड केली जाणार आहे. कार्याध्यक्ष, मुख्य कार्यवाह, इतर कार्यवाह आणि खनिजदार आदी महत्वाच्या पदाची निवडणूक त्यावेळी होणार आहे.

इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम; राज्यात गॅस टंचाईची भीती, वितरकांना पोलीस संरक्षण

यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा प्रतिसाद देखील लक्षणीय वाढलेला दिसून आला. मध्यवर्ती कार्यालयात मागील निवडणुकीत केवळ 15 मतदारांनी मतदान केले होते. मात्र यंदा हा आकडा 51 वर पोहोचला. नायगाव शाखेत 191 मतदारांनी तर आकुर्ली शाखेत 43 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेवर काही उमेदवारांनी आक्षेप देखील घेतले आहेत. निवडणुकीची माहिती सर्व मतदारांपर्यंत पोहोचवली गेली नाही, तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणुकीचा ठराव मंजूर झालेला नसताना देखील निवडणूक घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संस्थेचा वार्षिक अहवाल देखील प्रसिद्ध झालेला नसल्याचं सांगितलं जात आहे.

या संस्थेच्या निवडणुकीवर राजकीय छाया असल्याची चर्चा देखील रंगली आहे. कारण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार असून उपाध्यक्ष म्हणून भालचंद्र मुणगेकर, प्रभाकर नारकर, विद्या चव्हाण आणि शशी प्रभू कार्यरत आहेत. तर विश्वस्तांमध्ये सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि प्रताप आसबे यांचा समावेश आहे. दरम्यान, दादर येथील मध्यवर्ती संग्रहालयाचा हजारो कोटी रुपयांचा भूखंड हा देखील चर्चेचा विषय ठरत आहे. संस्थेच्या सोयीसुविधांपेक्षा या मौल्यवान भूखंडावर काही पदाधिकाऱ्यांचा डोळा असल्याची चर्चा सुरू असल्याने संस्थेतील राजकारण अधिकच चिघळल आहे.

यामुळे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या सार्वजनिक ग्रंथालयांपैकी एक असलेल्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीकडे आता सांस्कृतिक क्षेत्रासोबतच राजकीय वर्तुळाचे देखील लक्ष लागले आहे.

follow us