ओडिशातील कटकमध्ये भीषण दुर्घटना! SCB मेडिकल कॉलेज रुग्णालयात आग; 10 रुग्णांचा मृत्यू

या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 5 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 34

Fire at SCB Medical College Hospital; 10 patients die : ओडिशातील कटक येथे असलेल्या SCB मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक रुग्ण जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी काही रुग्णांचा होरपळून तर काहींचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, किमान 5 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार SCB मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर इमर्जन्सी विभागातील आयसीयूमध्ये सोमवारी पहाटे साधारण 3 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. पहिल्या मजल्यावर असलेल्या या विभागात त्यावेळी अनेक गंभीर रुग्ण उपचार घेत होते. अचानक धूर पसरू लागल्याने आणि आग भडकू लागल्याने रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला.

आगीचे आणि धुराचे लोट पाहताच डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णांचे नातेवाईक यांनी तात्काळ रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न सुरू केला. काही रुग्णांना स्ट्रेचरवरून तर काहींना हातावर उचलून दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले. मात्र आयसीयूमधील काही रुग्ण आधीच गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना वाचवता आले नाही.

मृत्यू कसा झाला?

प्राथमिक माहितीनुसार, आयसीयूमध्येच 7 रुग्णांचा मृत्यू झाला. तर उर्वरित तीन रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमद्धे हलवताना धुरामध्ये गुदमरून किंवा प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

आगीचे कारण काय?

प्राथमिक तपासात ट्रॉमा केअर आयसीयूमधील विद्युत यंत्रणेमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र नेमके कारण शोधण्यासाठी सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे. रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा योग्यरीत्या कार्यरत होती का, याची देखील चौकशी केली जाणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.

बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान, रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यास आलं. दरम्यान रुग्णालयातील इतर वॉर्डमधील रुग्णांना खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.

प्रशासन सतर्क

या घटनेनंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने रुग्णालयात दाखल झाले. मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याबाबत तसेच जखमी रुग्णांच्या उपचारासाठी विशेष वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. ही घटना उघड झाल्यानंतर रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः आयसीयू सारख्या अतिसंवेदनशील विभागात आग लागणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून याबाबत सखोल चौकशीची मागणी होत आहे.

follow us