मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण ताजे आहे. या प्रकरणातील आठ आरोपींना अटक झाली आहे. या सर्वांवर मोक्का लावून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर तिसरा मुख्य आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अद्यापही फरार आहे. त्याला वाँटेड घोषित करण्यात आले आहे. एकूण तीन पातळ्यांवर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
या सगळ्या घडामोडी एका बाजूला घडत असतानाच हे प्रकरण राज्यभर चर्चेत आणणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एका खून प्रकरणाला हात घातला आहे. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी फरार आहेत. मात्र हे सगळे आरोपी वाल्मिक कराड अर्थात आकाच्या मुलाभोवती फिरत असतात असा आरोप धस यांनी केला आहे. त्यामुळे कराड पाठोपाठ त्याचा मुलगाही गोत्यात येण्याची शक्यता आहे. (What exactly is the Mahadev Munde murder case mentioned by BJP MLA Suresh Dhas?)
महादेव दत्तात्रय मुंडे हे मुळचे परळी तालुक्यातील भोपळा गावाचे रहिवासी होते. पेशाने व्यावसायिक असलेले मुंडे 2022 च्या आसपास ते आंबेजोगाई या ठिकाणी राहण्यास गेले. पण 22 ऑक्टोबर 2023 या दिवशी परळी तहसीलदार कार्यालयासमोर त्यांचा खून झाला. त्यानंतर परळीतील वनविभागाच्या कार्यालयासमोरील आवारात त्यांचा मृतदेह आढळला होता. धारदार शस्त्रांनी वार करत महादेव मुंडे यांचा खून झाल्याचे समोर आले होते. प्राथमिक तपासानुसार आर्थिक व्यवहारातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते.
पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू झाला. मात्र आजपर्यंत हे सर्वच्या सर्व आरोपी फरार आहेत. या दरम्यान, आरोपींविरोधात कारवाई न झाल्याने 16 जानेवारी 2024 रोजी परळी शहर बंदचा इशारा देण्यात आला होता. या बंदला व्यापारी संघटनेचाही पाठिंबा होता. आता याच महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी वाल्मिक कराड अर्थात आकाने प्रयत्न केले, असा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
धस म्हणाले, पोलीस निरीक्षक सानप यांनी या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणात एकूण सहा आरोपी निष्पन्न झाले. त्यानुसार सानप आरोपींना पकडण्यासाठी गेले होते. पण अमूक-अमूक व्यक्तीला आरोपी करू नका. राजाभाऊ फड आणि आमच्या पक्षात नसलेल्या पाच जणांना आरोपी करा, असे आकाने सांगितले. त्यांच्यावर दबाव टाकला. राजाभाऊ फड हे विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहणार होते. मात्र सानप प्रामाणिक अधिकारी होते. त्यांनी हे माझ्याकडून होणार नाही, असे आकाला सांगितले. त्यावरून आकाने त्यांना परळीतून जायला सांगितलं. सानपही स्वाभिमानाने निघून गेले.
आता सानप यांची बदली झाली आहे. त्यामुळे खुनाचा तपास लागला नाही. पण घटनेतील सर्वच आरोपी आकाचे चिरंजीव सुनिल कराड यांच्या अवतीभोवती फिरत असतात. अजूनही या आरोपींना अटक करण्यात आलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला गेले आहेत. ते महाराष्ट्रात आल्यानंतर मी त्यांची भेट घेऊन यासंदर्भातलं पत्र त्यांना देणार आहे. तसंच करुणा मुंडे यांच्याबाबतचं पत्रही तयार केलं आहे. गणेश मुंडे यांच्याबाबतचं पत्रही तयार आहे असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, धस यांच्या या दाव्यानंतर वाल्मिक कराड याचा मुलगा सुशील कराडही गोत्यात येण्याची शक्यता आहे. सुशील कराड याच्यावर यापूर्वीच मॅनेजरच्या घरात घुसून त्याला मारहाण करत त्याच्या अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचबरोबर बंदुकीचा धाक दाखवून दोन बल्कर, दोन कार तसेच सोने आणि प्लॉट बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सुशील वाल्मीक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्यावर हा आरोप आहे. अद्याप या प्रकरणातही गुन्हा दाखल झालेला नाही.
आता धस महादेव मुंडे यांच्या हत्येचे प्रकरण कसे धसास लावतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.