माळेगाव नगरपरिषदेच्या निकालानंतर चर्चेत आलेली ‘ईश्वर चिट्ठी’ म्हणजे काय? ती कधी काढली जाते?

माळेगावमध्ये अपक्ष उमेदवाराचा ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून विजय; नेमकी ईश्वर चिट्ठी म्हणजे काय? आणि ती कधी काढली जाते?

Untitled Design (136)

Untitled Design (136)

What is the ‘Ishwar Chitthi’ that came into the limelight? : राज्यभरात सध्या निवडणुकांच्या निकालांचे वारं वाहत असून आज जवळपास सर्वच नगरपरिषद आणि नगरपालिकांचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपने या निकालात सेंचुरी मारली असून भाजप(BJP) हा राज्यातला मोठा पक्ष ठरला आहे. मतमोजणी प्रक्रियेत पुणे(Pune) जिल्ह्यात एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळाला. माळेगाव नगर पंचायत भाजप राष्ट्रवादीच्या ताब्यात आली असून अजित पवारांचा(Ajit Pawar) नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी झाला आहे. माळेगावामध्ये राष्ट्रवादी-भाजपने 17 पैकी 10 ठिकाणी विजय मिळवला. यामध्ये एका अपक्ष उमेदवाराचा ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून विजय झाला आहे. गायत्री राहुल तावरे आणि जयश्री बाळासाहेब तावरे या दोन्ही उमेदवारांना 616 मत अशी समान मतं पडल्याने ईश्वर चिट्ठी काढण्यात आली. यामध्ये अपक्ष उमेदवार जयश्री बाळासाहेब तावरे या विजयी झाल्या आहेत. तर या लेखातून आज आपण जाणून घेऊयात की, नेमकी ईश्वर चिट्ठी म्हणजे काय? आणि ती कधी काढली जाते?

निवडणूक प्रक्रियेत अनेकदा उत्कंठा वाढवणारे क्षण अनुभवायला मिळतात. विशेष करून ज्यावेळेस एकमेकांसमोरील उमेदवारांना सारखीच मतं पडतात. त्यावेळेस द्विधा मनस्थिती निर्माण होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाला काही ठरविक कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. अशा वेळी सगळ्यात पहिले मतमोजणी पुन्हा एकदा काळजीपूर्वक केली जाते. मात्र पुन्हा मोजणी करूनही दोन्ही उमेदवारांच्या मतदानाची आकडेवारी सारखीच राहिली, तर शेवटचा पर्याय म्हणून ईश्वर चिट्ठी काढली जाते. या चिठ्ठीत दोन्ही उमेदवारांची नावं लिहून टाकली जातात. आणि पारदर्शकपणे चिठ्ठी काढली जाते. ज्या उमेदवाराचं नाव या चिठ्ठीत येतं, त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येतं. या प्रक्रियेला कायदेशीर मान्यता असून निवडणूक निकालासाठीची ही अंतिम प्रक्रिया आहे.

श्रीवर्धन नगरपालिकेत मोठा ट्विस्ट; ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडून आलेला उमेदवार करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश?

अशीच एक घटना पुणे जिल्ह्यात जानेवारी 2021 मध्ये पार पडलेल्या चाले ग्रामपंचायत निवडणुकीत घडली होती. या निवडणुकीत दोन उमेदवारांना समसमान मते मिळाल्यानंतर मतमोजणी पुन्हा करण्यात आली. तरीही निकालात फरक न पडल्याने अखेर ईश्वर चिठ्ठी काढून निकाल घोषित करण्यात आला होता. या घटनेमुळे राज्यभरात ईश्वर चिठ्ठीची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली होती.

खरं तर ही प्रक्रिया नवीन नाही. राज्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणुका, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका, नगर परिषद तसेच नगरसेवक पदाच्या निवडणुकांमध्ये याआधीही अशा प्रकारे ईश्वर चिठ्ठीचा वापर करण्यात आला आहे. जेव्हा लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा कौल पूर्णपणे समसमान ठरतो, तेव्हा कायदेशीर चौकटीतून मार्ग काढण्यासाठी ही पद्धत वापरली जाते.

या घटनांमधून लोकशाहीतील एक वेगळाच पैलू समोर येतो. मतदारांचा कौल जेव्हा पूर्णपणे समान ठरतो, तेव्हा निर्णयासाठी नशिबाचा आधार घ्यावा लागतो. ‘ईश्वर चिठ्ठी’ ही प्रक्रिया जरी अनोखी वाटत असली, तरी ती लोकशाही व्यवस्थेतील एक मान्य आणि पारदर्शक मार्ग मानला जातो. त्यामुळे निवडणूक निकाल जाहीर करताना कायदा, प्रक्रिया आणि लोकशाही मूल्ये यांचा समतोल साधला जातो, हे या उदाहरणांतून स्पष्ट होते.

Exit mobile version