Ranajagjitsinh Patil : महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास (Ranajagjitsinh Patil ) आघाडीमुळे शिल्लक राहिलेल्या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखली. राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेची अर्थात एम.एन.सी.ची मान्यता मिळविली आणि शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये पुन्हा एकदा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. आता या महाविद्यालयातून पहिली बॅच डॉक्टर होऊन बाहेर पडेल असं आश्वासन राणा जगजितसिंह पाटील यांनी दिल आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरी नंतरही जागेचा मुलभूत प्रश्न तसाच प्रलंबित होता. ३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला आपण प्राधान्याने हातात घेतले. तत्कालीन ठाकरे सरकारकडे त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र धाराशिवकरांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न सोडविण्याकडे ठाकरे सरकार आणि त्यांंच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष केले.
तज्ञ डॉक्टरांसह सुसज्ज वैद्यकीय संकुल; ३१ एकर जागाही ताब्यात, राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारकडे आपण जागेसाठी पुन्हा पाठपुरावा सुरू केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शहरातील शासकीय आय.टी.आय. आणि जलसंपदा विभागाची जागा मिळावी याकरिता प्रयत्न सुरू केले. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गालगत असलेली मोक्याची जागा तत्कालीन शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून मंजूर करवून घेतली.
कौशल्य विकास व जलसंपदा विभागाकडून जागेचा ताबा महसूल विभागाने शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.शिल्पा डोमकुंडवार यांच्याकडे ऑगस्ट महिन्यातच सोपविला आहे. विद्यार्थी, रूग्ण आणि रूग्णांच्या नातेवाईकांच्या दृष्टिने अत्यंत महत्वाची आणि सोयीची असणारी ही जागा मिळविण्यात आपल्याला यश आले आहे. काही जणांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पोहनेर रस्त्यावरील दगडखानी जवळील अडगळीच्या जागेत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. ते हाणून पाडत धाराशिवकरांच्या व्यापक हिताचा निर्णय घेण्यात आपल्याला यश आले आहे..