सोयाबीन विक्री नोंदणीसाठी मुदतवाढ; शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, राणाजगजितसिंह पाटलांचं आवाहन

  • Written By: Published:
सोयाबीन विक्री नोंदणीसाठी मुदतवाढ; शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, राणाजगजितसिंह पाटलांचं आवाहन

Ranajagjitsinh Patil on Soybean Purchase : बारदान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला. आता अडचणी दूर झाल्या आहेत. खरेदीला गती आली आहे. (Ranajagjitsinh Patil) खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाल्यामुळे नाव नोंदणीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सोयाबीन विकण्याची घाई न करता ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकरी बांधवांनी खरेदी केंद्राकडे नोंदणी करावी. सोयाबीन खरेदीनंतर अवघ्या चार दिवसांत प्रतिक्विंटल चार हजार ८९२ रुपयांप्रमाणे पेमेंट खात्यात जमा केले जात आहे. शनिवारपर्यंत ६० लाखाहून अधिक रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्गही करण्यात आले आहेत अशी माहिती तुळजापूर विधासभेचे भाजप उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. ते प्रचार सभेत बोलत होते.

खरेदी केंद्रावरच सोयाबीनची विक्री करावी

धाराशिव जिल्ह्यातील १७ हमीभाव खरेदी केंद्रांवरून सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे. सुरूवातीच्या काळात सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे खरेदी प्रक्रियेत विलंब निर्माण झाला होता. फेडरेशनकडे पाठपुरावा करून बारदाना निविदा प्रक्रिया तातडीने राबवून जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला बारदाना उपलब्ध करून घेतला आहे. हमीभाव केंद्रांवर खरेदी प्रक्रियेला आता गती आल्यामुळे खुल्या बाजारात सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी नोंदणीसाठी दिलेल्या पुढील १० दिवसांच्या मुदतवाढीचा उपयोग करून घ्यावा. ज्या शेतकर्‍यांनी फेडरेशनकडे नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून सोयाबीन खरेदी केंद्रावरच सोयाबीनची विक्री करावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी कायम कटीबद्ध; प्रचार दौऱ्यात राणाजगजितसिंह पाटलांचा शब्द

जिल्ह्यातील भूम, दस्तापूर, गुंजोटी, ईट, नळदुर्ग, कळंब, वाशी, उमरगा, धाराशिव, सोन्नेवाडी, चिखली, शिराढोण, टाकळी बें, तुळजापूर, कानेगाव, कनगरा, चोराखळी आदी १७ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. आतापर्यंत १२ हजार १०० शेतकर्‍यांनी फेडरेशनकडे नोंदणी केली असून, ३२० शेतकर्‍यांच्या सात हजार ३०० क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे. त्यापैकी ६० शेतकर्‍यांच्या खात्यावर बाराशे क्विंटल सोयाबीन खरेदीपोटी ६० लाखाहून अधिक पेमेंट जमा झाले आहे. यापूर्वी नोंदणीसाठी १५ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे नोंदणीसाठी मुदतवाढ करण्यात यावी, यासाठी आपण आग्रही मागणी केली होती असंही ते यावेळी म्हणाले.

चार दिवसात पेमेंट खात्यात जमा

यापूर्वी हमीभाव खरेदी केंद्रात विक्री केलेल्या सोयाबीनचे पैसे मिळावेत, यासाठी चकरा माराव्या लागत होत्या. मात्र, आता चार दिवसांच्या आत शेतकर्‍यांच्या खात्यावर सोयाबीनचे पैसे जमा होत आहेत. दस्तापूर व धाराशिव केंद्रावर सोयाबीन विक्री केलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर ६० लाख ९७ हजार रूपये जमा करण्यात आले आहेत. खरेदी केंद्रावर १२ टक्के आर्द्रतेचा निकष आहे. वाहतूक खर्चाचे नुकसान टाळण्यासाठी सोयाबीन हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी नेण्यापूर्वी आर्द्रतेची तपासणी करून घ्यावी. त्यानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्री करण्याची घाई न करता लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी असंही राणाजगजितसिंह पाटील यावेळी म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube