Download App

मोदीजी, संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार? हर्षवर्धन सपकाळांचा प्रश्न 

Harshvardhan Sapkal : संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू

  • Written By: Last Updated:

Harshvardhan Sapkal : संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. नेहरुंनी बाबासाहेबांना सन्मानाने देशाच्या पहिल्या कायदा मंत्रिपदाची जबाबदारी दिली. आज काँग्रेस (Congress) पक्षाचा अध्यक्षही दलित समाजाचा आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार? असा थेट सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा खरपूस समाचार घेत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत हास्यास्पद आहे, या विधानाचा मी जाहीर निषेध करतो. काँग्रेस पक्षाने देशासाठी दिलेले योगदान अधोरेखीत झालेले आहे, काँग्रेसला जाज्वल्य इतिहास आहे, हे मोदीच काय कोणीही नाकारू शकत नाही. काँग्रेस सरकारच्या काळात साक्षरतेपासून अंतराळापर्यंत प्रगती केलेली आहे.

नरेंद्र मोदी हे 11 वर्षापासून सत्तेत आहेत, या 11 वर्षांत त्यांनी देशाचे काय भले केले, हे त्यांनी जाहीर करावे. नरेंद्र मोदी यांनी हिंदू-मुस्लीम, दलित-सवर्ण-ओबीसी यांच्यात द्वेष निर्माण करण्याचेच काम केले आहे. तीन तलाक, वक्फ बोर्ड सारखे मुद्दे उपस्थित करून मोदीजींनी मुस्लीम महिलांबद्दलची आपली खोटी तळमळ दाखवण्याचा प्रयत्न केला पण मोदींनी गेल्या 11 वर्षात एकाही मुस्लीम महिलेला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री केले नाही.

मोदींनी गेल्या 11 वर्षात एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात मुस्लीम आणि दलितांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यांचे लिंचिंग केले जात आहे ते रोखण्यासाठी मोदींनी काहीही केले नाही त्यामुळे त्यांच्या कोरड्या भाषणबाजीला काही अर्थ नाही. देशात शेतकऱ्यांचा शेतमालाला भाव मिळत नाही, तरुणांना रोजगार मिळत नाही, देशातील बहुजन समाज अस्वस्थ आहे. या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे पण मोदी मात्र स्वतःची आरती करून घेत आहेत. असं देखील यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तसेच मोदींनी कोराना काळात टाळी, थाळी वाजवायला लावली आता अमेरिकेच्या टेरिफवर काय भूमिका आहे ते स्पष्ट करावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशातील गरिबांची संख्या मोदींच्या काळात वाढत आहे, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, लाखोंच्या संख्येने लोक देश सोडून चालले आहेत हेच मोदींनी देशाचे भले केले आहे का. भाजपा सरकारमध्ये दलित अत्याचार वाढले आहेत, मॉब लिंचिग सारखे प्रकार दलितांबाबत झाले आहेत, ते थांबावे यासाठी मोदींनी काहीही प्रयत्न केले नाहीत. सातत्याने काँग्रेसवर टीका करणे हेच त्यांचे काम राहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाजपा, रा. स्व. संघ यांना किती प्रेम आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, याच विचाराच्या लोकांनी बाबासाहेबांचा सातत्याने अपमान केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला रा. स्व. संघ पहिल्यापासूनच मानत नाही. रामलीला मैदानावर बाबासाहेबांचे संविधान कोणी जाळले, हे मोदींना माहित नाही का? परंतु खोटा इतिहास सांगून दिशाभूल करणे ही संघाची शिकवण आहे, तेच मोदी करत आहेत. पण त्यांच्या अशा विधानाने खरा इतिहास झाकला जाणार नाही व रा. स्व. संघ, भाजपा व मोदींनी केलेली पापं धूवून निघणार नाहीत.

‘फुले’ चित्रपट प्रकरण, अकलेचा कांदा… म्हणजे कोण? संजय राऊतांना महसूल मंत्री बावनकुळेंचं प्रत्युत्तर

प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीवर प्रेम असले पाहिजे हे संविधान सांगते, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही भारताची परंपरा आहे, ‘आतां विश्वात्मके देवे’, हे ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे तत्वज्ञान आहे, तेच तत्वज्ञान काँग्रेसचे आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

follow us