‘फुले’ चित्रपट प्रकरण, अकलेचा कांदा… म्हणजे कोण? संजय राऊतांना महसूल मंत्री बावनकुळेंचं प्रत्युत्तर

‘फुले’ चित्रपट प्रकरण, अकलेचा कांदा… म्हणजे कोण? संजय राऊतांना महसूल मंत्री बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut : सध्या राज्यात फुले या चित्रपटामुळे राजकारण तापले आहे. या चित्रपटावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे तर आता या टीकेला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी खासदार संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच खासदार संजय राऊत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजकीयदृष्टया संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कधी काळी उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते, या गोष्टीवर विश्वास बसू नये, असाच त्यांचा सध्याचा वावर आहे. ‘सामना‘ तील अलीकडच्या काही दिवसांतील अग्रलेख  हे उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्टया संपविण्यासाठी संजय राऊतांकडून लिहिले जात आहेत, अशी शंका खुद्द उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या माणसांकडूनच व्यक्त केली जात आहे. अकलेचा कांदा… म्हणजे कोण तर याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला चांगलंच ठाऊक आहे. हो तेच बिनबुडाचे चंबू! रोज सकाळी उठून आपणच किती ग्रेट, थोर, विचारवंत आहोत असे भासवण्याचा ज्यांना ऊत येतो तेच ! ते कोण आहेत? हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. आजही त्यांनी भांडण लावण्याचा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्रात केला. त्यांची कीव आली. सत्ता गेली की व्यक्ती किती अगतिक होतो, बरळू लागतो, आजूबाजूचे पिवळे दिसू लागते.

महात्मा जोतिबा फुले यांच्यावरील चित्रपटावरून त्यांना मानसिक ऊत आला, त्यांनी गरळ ओकली. लोकनेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. अर्थात, ज्यांनी आरोप केले त्यांना खरंतर बुडंच नाही. काय तर म्हणे, फुले विरुद्ध फडणवीस!!

झोपेचे सोंग घेतलेला संजय बिनकामाचा

अरे महाभागा, तुमची बुद्धी गचाळ होत चालली. देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असलेल्या महायुती सरकारने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न‘ द्यावे अशी शिफारस विधिमंडळात ठराव करून केंद्र सरकारला केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना असे काही सुचले नाही आणि आता त्यांचे बगलबच्चे फुले विरुद्ध फडणवीस असा नवा शोध लावून बोंबलत सुटले.

महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत खोटारड्यांवर आसूड ओढला. तरी अक्कल ठिकाणावर आली नाही. उद्धव ठाकरे यांना कळतच नाही की, नव्या महाभारतात झोपेचे सोंग घेतलेला संजय बिनकामाचा आहे. सर्व संपल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. पण तेव्हा ते काहीच करू शकणार नाहीत. अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.

WhatsApp वर Blurry Image स्कॅम; सायबर चोरट्यांच्या निशाण्यावर कोण?, कसा कराल बचाव…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube