एमडी परीक्षेत मुलीचे दोन गुण वाढविले; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची थेट खुर्ची गेली
Shivajirao Patil Nilangekar: शिवाजीराव पाटील निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील. ते स्वातंत्र्यसैनानी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले.
NEET Paper Leak: नीट परीक्षा पेपरफुटीवरून (NEET Paper Leak) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत संघर्ष पेटलाय. कॉकरेच जनता पार्टीने (cockroach Janta Party) जंतर-मंतरवर आंदोलन केले. त्यानंतर थेट संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी थेट बळाचा वापर करून मोर्चा मोडीत काढला. परंतु दिल्ली पेटलेले असतानाही शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला नाही. पण महाराष्ट्रात चाळीस वर्षांपूर्वी मुलीचे एमडी परीक्षेत दोन गुण वाढविल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना थेट पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या व्यक्तीला मोठा राजकीय किंमत मोजावी लागली होती. ती व्यक्ती होती स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar).
तीन वेळा परीक्षेत फेल पण वडिल मुख्यमंत्री झाल्यानंतर एमडी पास
शिवाजीराव पाटील निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील. ते स्वातंत्र्यसैनानी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले. 3 जून 1985 रोजी ते राज्याचे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. राज्याची धुरा ते चांगल्या पद्धतीने ते सांभाळत होते. परंतु मुलीला एमडी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन गुण वाढविल्याचा आरोप त्यांच्यावर आरोप झाला. त्यांची मुलगी चंद्रकला या मुंबई विद्यापीठात एमडीचे शिक्षण घेत होत्या. स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती ही परीक्षा त्या देत होत्या. तब्बल तीन वेळा परीक्षा देऊनही त्या उत्तीर्ण झाल्या नव्हता. परंतु वडील शिवाजीराव निलंगेकर हे मुख्यमंत्री झाल्यानंतर चौथ्या प्रयत्नात चंद्रकला या एमडी उत्तीर्ण झाल्या. परंतु एक आरोपाचे वादळ आले. मुख्यमंत्र्यांनी पदाचा गैरवापर करून मुलीचे दोन गुण वाढवून घेऊन तिला उत्तीर्ण केल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केला.
प्रकरण उच्च न्यायालयात, निलंगेकरांचा राजीनामा
विरोधकांनी हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात नेले. न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले. त्यात निलंगेकरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यामुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी शिवाजीराव निलंगेकरांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. 6 मार्च 1986 मध्ये निलंगेकर यांनी मुख्यमंत्रिपद सोडले. केवळ दहा महिने निलंगेकर हे मुख्यमंत्रिपदावर होते. पुढे निलंगेकरांना या प्रकरणात क्लीनचिट मिळाली. परंतु एका आरोपामुळे त्यांना राज्याचे प्रमुखपद सोडावे लागले होते.
18 वर्षानंतर पुन्हा झाले मंत्री
त्यानंतर ते तब्बल 18 वर्षे राजकीय वनवासात राहिले. ते काळ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले. परंतु 2003 मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांना महसूलमंत्रिपद मिळाले होते. परंतु 2004 ला भाजपकडून नातू संभाजी पाटील निलंगेकर यांनी आजोबा शिवाजीराव निलंगेकरांना पराभूत केले. त्यानंतर 2009 ला शिवाजीराव निलंगेकर हे पुन्हा रिंगणात उतरले आणि त्यांना नातू संभाजी पाटील यांचा पराभव करत कमबॅक केले होते. पुढे ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले. 2020 मध्ये पुण्यात त्यांचे निधन झाले आहे.