‘पंचायत’ सीझन 4 चा दबदबा कायम! NEXA इंडियन स्ट्रीमिंग अकॅडमी अवॉर्ड्स 2026 मध्ये दोन पुरस्कार
Panchayat Season 4 : TVF ने प्रेक्षकांना अनेक उत्कृष्ट मालिका दिल्या असून त्यांना भरभरून प्रेम मिळाले आहे. त्यापैकीच एक म्हणजे पंचायत.
Panchayat Season 4 : TVF ने प्रेक्षकांना अनेक उत्कृष्ट मालिका दिल्या असून त्यांना भरभरून प्रेम मिळाले आहे. त्यापैकीच एक म्हणजे पंचायत. या मालिकेचा चौथा सीझन प्रदर्शित झाल्यानंतर देशभरातील प्रेक्षकांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता चाहते पुढील सीझनची आतुरतेने वाट पाहत असतानाच पंचायत सीझन 4 ने NEXA इंडियन स्ट्रीमिंग अकॅडमी अवॉर्ड्स 2026 मध्ये मोठा मान मिळवला आहे. मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिका (Best Series) आणि सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्टोरी (Best Original Story) हे दोन पुरस्कार जिंकले आहेत. तसेच, लेखक चंदन कुमार यांना Best Original Story (Series) या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या मोठ्या यशाचा आनंद साजरा करत निर्मात्यांनी सोशल मीडियावर लिहिले:
“NEXA इंडियन स्ट्रीमिंग अकॅडमी अवॉर्ड्स 2026 मध्ये ‘पंचायत’ सीझन 4 ला सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! तसेच @chandan_jpg यांना सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्टोरी (Series) पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!*
पंचायत’ सीझन 4 ला या उंचीवर पोहोचवण्यासाठी अथक मेहनत घेणाऱ्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार. आमच्या कथांवर विश्वास ठेवून त्या लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी Prime Video चेही विशेष आभार. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या प्रवासाला यशस्वी बनवणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचे मनःपूर्वक धन्यवाद. या सन्मानासाठी NEXA इंडियन स्ट्रीमिंग अकॅडमी अवॉर्ड्सचेही मनापासून आभार.”
2020 मध्ये सुरू झालेल्या पंचायतने ग्रामीण जीवनाचे साधेपण, वास्तव आणि भावनिक पैलू अतिशय सुंदर पद्धतीने मांडत प्रेक्षकांची मने जिंकली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला एक तरुण गावाचा पंचायत सचिव बनतो आणि त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित ही कथा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. काळाच्या ओघात ही मालिका एक सांस्कृतिक फिनॉमेनन ठरली. तिचे साधेपण, विनोद, भावनिक कथानक आणि वास्तववादी पात्रांमुळे ती विशेष ठरली. इतकेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कलाकारांशी संवाद साधताना पंचायतचा उल्लेख केला होता.
पंचायतला यापूर्वीही अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स 2025, पहिले IIFA डिजिटल अवॉर्ड्स 2025 आणि आयकॉनिक गोल्ड अवॉर्ड्स 2026 यांसारख्या मोठ्या मंचांवर मालिकेने सन्मान मिळवला आहे. पुरस्कारांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही पंचायत ने मोठी लोकप्रियता मिळवली असून, जितेंद्र कुमार, फैसल मलिक, अशोक पाठक आणि दुर्गेश कुमार यांसारख्या कलाकारांना घराघरांत ओळख मिळवून दिली आहे.
चर्चेसाठी तयार पण त्यांनी राजकीय तमाशा निवडला; राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान स्पष्टच बोलले
पंचायतचे यश हे TVF च्या प्रभावी आणि दर्जेदार कथाकथनाचेही प्रतीक आहे. गेल्या काही वर्षांत TVF ने सातत्याने अशा कथा सादर केल्या आहेत, ज्यांच्याशी सर्व वयोगटातील प्रेक्षक सहज जोडले गेले. नुकत्याच झालेल्या Prime Video Presents कार्यक्रमातही TVF ने आपल्या दमदार आगामी प्रोजेक्ट्सची घोषणा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. Vvan आणि College Fest या चित्रपटांसह Pyramid आणि Vansh या नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली. तसेच Aspirants, Panchayat, Gram Chikitsalay, Sapne vs Everyone आणि Sandeep Bhaiya यांच्या नव्या सीझनचीही घोषणा करत स्टुडिओने संध्याकाळतील सर्वात दमदार आणि वैविध्यपूर्ण लाइनअप सादर केली.