‘दुपहिया’चा गोंधळ पुन्हा रंगणार; सीझन 2 चा प्रीमियर 1 ऑक्टोबरला
Dupahiya Season 2 : या कलाकारांच्या टीममध्ये यावेळी भोजपुरी अभिनेता आणि गायक दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ यांचीही भर पडली आहे.
Dupahiya Season 2 : प्रेक्षकांच्या पसंतीस (Dupahiya) उतरलेल्या ‘दुपहिया’ या हिंदी ओरिजिनल सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राइम व्हिडिओने ‘दुपहिया’ सीझन 2 च्या प्रीमियरची तारीख जाहीर केली असून, 1 ऑक्टोबर 2026 रोजी या सीरिजचा जगभरात प्रीमियर होणार आहे. काल्पनिक धडकपूर गावाच्या पार्श्वभूमीवर रंगणाऱ्या या कॉमेडी-ड्रामामध्ये यावेळीही गोंधळ, विनोद आणि नव्या संकटांची मेजवानी पाहायला मिळणार आहे.
पहिल्या सीझननंतर धडकपूरच्या कथेत आता नवी वळणं येणार आहेत. पूर्वी गुन्हेमुक्त असलेल्या या गावासमोर नव्या अडचणी उभ्या राहणार असून, त्यातून निर्माण होणारा गोंधळ हा सीरिजचा केंद्रबिंदू असणार आहे. छोट्या शहरातील जीवन, निरागसपणा आणि दैनंदिन समस्यांमधून निर्माण होणारा विनोद या सीझनमध्येही कायम ठेवण्यात आला आहे.
‘दुपहिया’ सीझन 2 चे दिग्दर्शन सोनम नायर यांनी केले आहे. सलोना बैन्स जोशी आणि शुभ शिवदासानी यांनी बॉम्बे फिल्म कार्टेल एलएलपीच्या बॅनरखाली या सीरिजची निर्मिती केली आहे. अविनाश द्विवेदी आणि चिराग गर्ग यांनी सीरिजची निर्मिती आणि लेखन केले आहे. पहिल्या सीझनमधील प्रमुख कलाकारही दुसऱ्या सीझनमध्ये कायम असून गजराज राव, रेणुका शहाणे, स्पर्श श्रीवास्तव, भुवन अरोरा, शिवानी रघुवंशी आणि यशपाल शर्मा यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.
भूतकाळाचे पडसाद, वर्तमानाची धग आणि भविष्याची चाहूल; ‘वेट्टुवम’च्या विश्वाची पहिली झलक प्रदर्शित!
या कलाकारांच्या टीममध्ये यावेळी भोजपुरी अभिनेता आणि गायक दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ यांचीही भर पडली आहे. त्यामुळे नव्या सीझनमधील कथानकात आणखी काही नवीन रंग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या सीझनमधील व्यक्तिरेखांशी प्रेक्षकांचा निर्माण झालेला जिव्हाळा लक्षात घेता, त्यांच्या पुढील प्रवासावर सीझन 2 मध्ये भर देण्यात आला आहे.
प्राइम व्हिडिओ आणि अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडियाचे ओरिजिनल्स (SVOD) प्रमुख निखिल माधोक यांनी ‘दुपहिया’ला प्रेक्षकांशी थेट नाते जोडणाऱ्या कथांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रतिसादानंतर धडकपूरमधील आवडत्या व्यक्तिरेखा नव्या गोंधळासह परतत असल्याचे त्यांनी सांगितले. या सीझनमध्ये विनोदासोबतच भावनिक आणि मनाला भिडणारे प्रसंगही पाहायला मिळणार असल्याचे निर्माते सलोना बैन्स जोशी आणि शुभ शिवदासानी यांनी सांगितले.
दरम्यान, दुपहिया’ सीझन 2 चा प्रीमियर 1 ऑक्टोबर 2026 रोजी भारतासह जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवर होणार आहे. त्यामुळे धडकपूरच्या नव्या कथेत यावेळी कोणती संकटं उभी राहणार आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ कसा रंगणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.