“संजय राऊत” या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांना भाजपमध्ये नित्यनियमाने कोण उत्तर देते? त्यांना कोण पुरुन उरते? असा प्रश्न विचारला तर सगळ्यात पहिले नाव डोळ्यासमोर चमकते ते भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असतील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा अन्य मोठे नेते असतील, ते कोणीही संजय राऊत यांना फारसे उत्तर देत बसत नाहीत. फडणवीस तर ‘कोण राऊत?’ असा प्रश्न विचारुन त्यांची हेटाळणी करतात. पण नितेश राणे, निलेश राणे आणि नारायण राणे हे पिता-पुत्रांचे त्रिकूट उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना आक्रमकपणे प्रत्युत्तर देतात. (Who omitted Nitesh Rane’s name from the list of media talkers and why?)
संजय राऊत रोज सकाळी नऊ वाजता माध्यमांसमोर येऊन दिवसभराचा अजेंडा सेट करतात. पण नितेश राणे “संजय राजाराम राऊत” असे त्यांचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका करतात. आदित्य ठाकरे यांना त्यांच्या आवाजावरुन, व्यक्तिमत्वावरुन हिणवतात. उद्धव ठाकरे यांनाही ते भीत नाहीत. थोडक्यात राऊतांच्या अजेंड्याला तोडण्याचे, नवीन अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न नितेश राणे करतात. यात ते कधी यशस्वी होतात तर कधी वादात सापडतात. पण ते थांबत नाहीत. आता हेच नितेश राणे भाजपमध्ये नेमके कोणाला नकोसे झाले आहेत? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
याचे कारण ठरले आहे ते आज (19 जुलै) भाजपने प्रसिद्ध केलेली माध्यमांशी बोलण्यासाठीच्या सदस्यांची यादी. भाजपने रोज माध्यमांशी नेमके कोणी बोलायचे याची एक यादीच आज दुपारी प्रसिद्ध केली. यात सकाळी नऊ वाजता कोणी बोलायचे, संध्याकाळी चार वाजता माध्यमांशी कोणी बोलायचे त्या सर्वांची नावे होते. शिवाय विभागनिहाय कोणी बोलायचे त्या सदस्यांचीही नावे यात होती. यातून नितेश राणे यांचे नावच गायब होते.
या दुपारी प्रसिद्ध झालेल्या यादीत सकाळी नऊ वाजता माध्यमांशी बोलण्याची जबाबदारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार पंकजा मुंडे आणि प्रवीण दरेकर यांच्यावर होती. तर दुपारी चार वाजताची जबाबदारी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, खासदार अशोक चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, आमदार अतुल भातखळकर आणि राम कदम यांच्यावर होती. यात नित्यनियमाने अत्यंत आक्रमकपणे ठाकरेंच्या शिवसेनेवर, संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या नितेश राणे यांचे कुठेही नाव नव्हते.
ही चूक लक्षात येताच संध्याकाळी पाच वाजता दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात सकाळी नऊ वाजतासाठी माध्यमांशी बोलणाऱ्यांमध्ये पाचव्या नंबरवर नितेश राणे यांचे नाव टाकण्यात आले. आता ही चूक नेमकी कोणाच्या लक्षात आली, नितेश राणे यांचे नाव कोणी आठवून दिले हे भाजपमधील नेत्यांनाच माहिती. पण त्यांचे नाव कोणी वगळायला सांगितले की नजरचुकीने राहिले की नितेश राणे भाजपमध्येच कोणाला नकोसे आहेत, हा संशोधनाचा विषय आहे हे नक्की.